‘राहुल- अंजली नसते तर..’; ‘केजो’च्या ‘त्या’ पोस्टवर मराठी अभिनेत्याची कमेंट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर याने दिग्दर्शित केलेला ‘कुछ कुछ होता है’ हा चित्रपट एव्हरग्रीन कलाकृतींपैकी एक आहे. दिनांक १६ ऑक्टोबर १९९८ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी हे मुख्य भूमिकेत होते. तर अनुपम खेर, रिमा लागू, फरिदा जलाल, अर्चना पुरण सिंग, जॉनी लिवर आणि पाहुणा कलाकार म्हणून सलमान खान आधी एकंदरच तगडी स्टारकास्ट पहायला मिळाली. अलीकडेच या चित्रपटाला २५ वर्ष पूर्ण झाली आणि या निमित्ताने करण जोहरने एक भावुक पोस्ट शेअर केली होती. ज्यावर एका मराठी कलाकाराची कमेंट चर्चेत आली आहे.

दिग्दर्शक करण जोहर याने हि पोस्ट शेअर करताना लिहिले आहे कि, ‘२५ वर्षांपूर्वी या गोष्टीची सुरुवात झाली आणि आज ही केवळ एक गोष्ट नसून, हा चित्रपट माझ्यासाठी माझ्या भावना आहेत. तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रेमामुळे हे शक्य झालं. माझ्या कथेवर मनापासून प्रेम केल्याबद्दल सर्व प्रेक्षकांना मी धन्यवाद म्हणतो. या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्गजांबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली होती. माझा चित्रपट पाहणाऱ्या सर्व लोकांचा मी सदैव ऋणी राहीन. हा चित्रपट माझ्या कायम जवळचा असेल’.

करण जोहरच्या या भावनिक पोस्टवर मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता चिन्मय मांडलेकर याने एक कमेंट केली आहे. जिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यात त्याने लिहिलं, ‘या चित्रपटाला अनेकांनी नावं ठेवली पण, माझं या चित्रपटावर मनापासून प्रेम आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर साधारण एक दशकानंतर जन्मलेल्या माझ्या मुलीला सुद्धा ”कुछ कुछ होता है” तेवढाच आवडतो. करण जोहर सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. राहुल- अंजली नसते, तर आज रॉकी आणि रानीदेखील नसते’.