पिंगा गं पोरी पिंगा!! ‘बाईपण भारी देवा’च्या शोला उत्साही महिलांचा कल्ला; थिएटरमधला ‘तो’ व्हिडीओ Viral


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांचा ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट रिलीज झाल्यापासून सर्व शो हाऊसफुल्ल सुरु आहेत. चित्रपटाच्या मूळ कथानकात बाईपणाची अशी गोष्ट आहे जी केवळ स्त्रियांना नव्हे तर पुरुषांना देखील एक समज देऊन जाते आहे. प्रत्येक स्त्रीला जगताना आणि समाजात वावरताना आपले अस्तित्व टिकवून नव्या उमेदीने फुलण्याची प्रेरणा या चित्रपटातून दिली जात आहे. हा चित्रपट ३० जून २०२३ रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित झाला असून सुपरहिट सुरु आहे. विशेष करून महिला वर्गाचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सोशल मीडियावर ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट कमालीचा चर्चेत आहे. इतकेच नव्हे तर चित्रपटाला मिळणार प्रतिसाद अगदी भारावून टाकणारा आहे. महिलांचा जल्लोष आणि महिलांमधील उत्साह पाहून सगळेच चकित होत आहेत. मुंबई, पुणे यांसह विविध शहरात हा चित्रपट सुपरहिट होताना दिसतोय. या चित्रपटाला स्त्रियांचा मिळणारा प्रतिसाद अभिनेत्री शिल्पा नवलकर यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओतून दिसतोय. हा व्हिडीओ एका चित्रपटगृहातील आहे. जिथे ‘बाईपण भारी देवा’ या गाण्यावर थिएटरमध्ये महिला पिंगा घालत आहेत आणि आनंद लुटत आहेत. यासोबत आणखी काही थिएटरमधील व्हिडीओ शेअर केले आहेत.

‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या अभिनेत्री शिल्पा नवलकर यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये एका चित्रपटगृहात काही महिला ‘बाईपण भारी देवा’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. तर काही महिला आनंदाने पिंगा घालत आहेत. यासोबत काही महिलांनी मॉलच्या बाहेर मंगळागौर साजरी केली आहे. या पोस्टसोबत कॅप्शन देताना शिल्पा नवलकर यांनी लिहिलंय, ‘ह्या उदंड आणि उत्साही प्रतिसादासाठी बाईपण भारी देवाच्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार…प्रचंड कृतज्ञ’. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने पहिल्याच विकेंडला ६.४५ कोटींचा गल्ला जमवत या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा सुपरहिट मराठी चित्रपटाचा मान पटकावला आहे.