झुमे रे गोरी.. घुमे रे गोरी!! किशोरी गोडबोलेंचा लेकीसह गरबा; व्हिडीओ झाला व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या राज्यभरात नवरात्रीची धामधूम सुरु आहे. नवरात्र म्हटलं कि नवदुर्गांची पूजा करणे आणि रास गरबा, दांडिया खेळणे हे आलंच. या दिवसात अनेक नवरात्रोत्सव मंडळे गरबा नाईटचे आयोजन करताना दिसतात. यामध्ये अनेक सेलिब्रिटी मंडळी पाहुणे म्हणून उपस्थित राहतात. तर काही सेलिब्रिटी आपल्या कुटुंबासोबत गरबा खेळण्याचा आनंद लुटतात. अभिनेत्री किशोरी गोडबोले यांपैकी एक आहे. नवरात्रीनिमित्त किशोरी यांनी आपल्या लेकीसोबत गरबा खेळला आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

किशोरी गोडबोले या मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. सध्या त्या सिनेविश्वात फार कार्यरत नसल्या तरीही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. किशोरी गोडबोले यांची लेक सई गोडबोले देखील मराठी सिनेसृष्टीत कार्यरत आहे. २०२१ साली सईने मराठी सिनेविश्वात पदार्पण केले. आज या माय लेकींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आई किशोरी आणि लेक सई गरबा खेळताना दिसत आहेत. नवरात्रीनिमित्त त्यांनी खास तयार केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये किशोरी आणि त्यांची लेक सई आलिया भट्टच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या गाजलेल्या चित्रपटातील ‘ढोलिडा’ या लोकप्रिय गाण्यावर गरबा खेळताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सईने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओतील मायलेकींनी एनर्जी पाहून सगळेच थक्क झाले आहेत. अनेकांनी ‘दोघीही सारख्याच दिसत आहेत..’, ‘वाह काय कमाल एनर्जी आहे..’ अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. फक्त नेटकरी आणि चाहतेच नव्हे तर मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळींनी देखील या व्हिडिओवर कमेंट करत मायलेकींचं कौतुक करत आहेत.