सौरभ गोखले अभिनित ‘वीर सावरकर- सिक्रेट फाइल्स’ वेब सीरिजच्या शूटिंगला सुरुवात


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स’ या हिंदी भाषेतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावरील पहिल्या वेबसीरिजच्या चित्रीकरणाचा प्रारंभ भोर येथील राजवाड्यात घटस्थापनेच्या मुहूर्तावर करण्यात आला. यावेळी या वेब सीरिजचे लेखक दिग्दर्शक योगेश सोमण, निर्माते आणि डेक्कन ग्रुपचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. अनिर्बान सरकार, डेक्कन ए व्ही मीडियाचे संचालक अजय कांबळे,प्रॉडक्शन हेड साची गाढवे, सिनेमॅटोग्राफर प्रसाद भेंडे, प्रोडक्शन डिझायनर, सिद्धार्थ तातूसकर,कला दिग्दर्शक महेश कोरे आदी उपस्थित होते.

दिग्दर्शक योगेश सोमण म्हणाले, ‘सावरकरांनी आपले संपूर्ण आयुष्य कुटुंबासहित देशकार्यासाठी अर्पण केले. त्यामुळे त्यांचे कार्य समाजासमोर आलेच पाहिजे असे आम्हाला वाटते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करणाऱ्यांना उत्तर देणे हे आमचे नॅरेटिव्ह नसून ‘वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स’ या वेबसीरिजच्या माध्यमातून इतिहासाला अवगत असणारे, ज्याचे पुरावे उपलब्ध आहेत, जे पुरावे तार्किक दृष्टीने मांडता येतील आणि त्यातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्व जसे होते तसे मांडण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे

सावरकर यांचे जीवन हा जवळपास १०० वर्षांचा इतिहास आहे. यातून लोकांनी त्यातून प्रेरणा घ्यावी, लोकांचे गैरसमज दूर व्हावे, राजकीय, सामाजिक स्वार्थांसाठी तयार केले जाणारे नॅरेटिव्ह पुसले जावे असा आमचा प्रयत्न असणार आहे. शिवाजी महाराज यांच्या व्यतिरिक्त सावरकर यांचे कुणीही गुरु नव्हते. सावरकर जन्मतः नेते होते. एकलव्यासारखी त्यांची वाटचाल आहे. सिक्रेट फाईल्स म्हणजे सावरकरांचे व्यक्तिमत्व जे लोकांना माहित नाही ते अनफोल्ड करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.