‘यशात, अपयशात एकच लक्षात ठेव..’; केदार शिंदेंनी लेकीला दिला मोलाचा सल्ला


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे यांचे ‘महाराष्ट्र शाहीर’ आणि ‘बाईपण भारी देवा’ असे दोन चित्रपट या वर्षात प्रदर्शित झाले. दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. यातील ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाच्या माध्यमातून केदार शिंदेंची लाडकी लेक सना शिंदेने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. इतकेच नव्हे तर ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटासाठी तिने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिले. अलीकडेच सनाचा वाढदिवस झाला आणि यानिमित्त केदार शिंदेंनी लेकीला मोलाचा सल्ला दिला.

दिनांक १८ ऑक्टोबर १९९८ रोजी सना शिंदेचा मुंबईत जन्म झाला. यंदा सनाचा २५ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. या निमित्त सनाचे वडील दिग्दर्शक केदार शिंदे यांनी लेकीसाठी एक खास पोस्ट शेअर करत तिला मोलाचा सल्ला देऊ केला. यात त्यांनी लिहिलं, ‘सना तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा… मोठी हो. यशस्वी हो. डोकं जमिनीवर आणि पाय जमिनीच्या आत राहू देत. यशात आणि अपयशात एकच लक्षात ठेव… हे दिवसही सरतील. श्री स्वामी कृपा सदैव राहो. तेच सांभाळतील तुला’.

केदार शिंदे यांनी आपल्या पोस्टमधून लेकीसाठी भरभरून आशीर्वाद आणि कानमंत्र दिला आहे. सना शिंदेने सिनेविश्वात पदार्पण केल्यानंतर स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आणि भक्कमपणे उभे राहण्यासाठी काय आवश्यक आहे ते केदार यांनी आपल्या पोस्टमधून तिला सांगितले आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातून सना शिंदेने शाहीर साबळे यांच्या पहिल्या पत्नी भानुमती साबळे यांची भूमिका साकारली. तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची, समीक्षकांची आणि कलाकार मंडळींची चांगली पसंती मिळाली. आता लवकरच सनाला नव्या प्रोजेक्ट्समध्ये पाहण्यासाठी तिचे चाहते आतुर आले आहेत.