हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अनेक विनोदवीर प्रेक्षकांच्या भेटीस आले. त्यापैकी एक म्हणजे अभिनेता प्रसाद खांडेकर. एक उत्तम अभिनेता म्हणून तो सर्वांसमोर आला आणि आता ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाच्या निमित्ताने तो पहिल्यांदाच दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात दिग्गज विनोदवीरांची स्टारकास्ट पहायला मिळणार असून नुकताच याचा टिझर रिलीज झाला आहे. हा चित्रपट येत्या २४ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसत आहे.
‘एकदा येऊन तर बघा’ या मराठी विनोदी चित्रपटाचा दमदार टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. साधारण १ मिनिट ४ सेकंदाचा हा टीझर आहे. जो प्रेक्षकांच्या छोट्याशा झलक मध्येही खळखळून हसवतोय. या चित्रपटाच्या टीझरमध्ये आपण पाहू शकतो कि, गिरीश कुलकर्णी आणि त्यांचे कुटुंबीय एका नव्या हॉटेलची सुरूवात करतात. गिरीश कुलकर्णी यांच्या पत्नीच्या भूमिकेत अभिनेत्री तेजस्विनी पंडित आहे. तर ओंकार भोजने आणि प्रसाद खांडेकर त्यांचे भाऊ आणि नम्रता संभेराव ही तेजस्विनीच्या बहिणीची भूमिका साकारते आहे.
या कुटुंबाच्या नव्याकोऱ्या हॉटेलमध्ये येणारे पाहुणे काय गोंधळ घालतात आणि त्यांच्या आयुष्यात उलथापालथ करतात हे पाहणे मजेशीर आहे. येत्या २४ नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये हा चित्रपट पाहणाऱ्या प्रत्येकाला हा आनंद अनुभवता येणार आहे. दरम्यान, या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रसाद खांडेकरने केले आहे. तर या चित्रपटात दिसणाऱ्या १६ विनोदवीरांमध्ये सयाजी शिंदे, गिरीश कुलकर्णी, तेजस्विनी पंडित, भाऊ कदम, ओंकार भोजने, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, विशाखा सुभेदार, पॅडी कांबळे, वनिता खरात, रोहित माने, शशिकांत केरकर, राजेंद्र शिसटकर, सुशील इनामदार, जय चौबे, राकेश शालिन यांचा समावेश आहे.