Jhimma 2 – ‘पुढच्या ट्रिपची तारीख ठरली…’; चित्रपट ‘झिम्मा 2’ प्रदर्शनाच्या वाटेवर


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Jhimma 2) कोरोनाच्या भीषण काळानंतर चित्रपटगृह खुलताच पहिला प्रदर्शित होणारा मराठी चित्रपट ठरला ‘झिम्मा’. या चित्रपटाने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगलाच गाजला. स्त्री वर्गाने ‘झिम्मा’ या चित्रपटाला अगदी डोक्यावर उचलून घेतले. तेव्हापासून या चित्रपटाचा पुढील भाग कधी येणार..? या प्रतीक्षेत सारेच जण होते. अखेर आता लवकरच ‘झिम्मा २’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आणि पहिले मोशन पोस्टर समोर आले आहे.

प्रचंड गाजलेल्या ‘झिम्मा’ या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, क्षिती जोग, मृण्मयी गोडबोले, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, अनंत जोग, चैत्राली गुप्ते या कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका होत्या. यानंतर आता ‘झिम्मा’ चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित होऊ घातला आहे. ज्याविषयी अभिनेत्री सायली संजीवने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये सायलीने एक टीझर व्हिडीओ शेअर केला आहे. सोबत लिहिलं आहे, ‘तुमचे आमचे रियुनियन- झिम्मा २’. (Jhimma 2) ‘पुढच्या ट्रिपची तारीख ठरली… आनंदाची गाडी सुटली! २४ नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात…’.

‘कलर यल्लो प्रोडक्शन’ आणि प्रसिद्ध दिग्दर्शक आनंद एल. राय प्रस्तुत, चलचित्र मंडळी आणि क्रेझी फ्यु फिल्म्स निर्मित ‘झिम्मा २’ (Jhimma 2) हा चित्रपट येत्या २४ नोव्हेंबर २०२३ रोजी सर्वत्र चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे निर्माते आनंद एल. राय आणि क्षिती जोग आहेत. तर विराज गवस, उर्फी काझमी, अजिंक्य ढमाळ हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. ‘झिम्मा २’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत कोणकोणते कलाकार पहायला मिळणार याविषयी अजून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र आता उत्सुकता प्रचंड वाढली आहे.