हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जगातील सर्वात संवेदनशील नाते म्हणजे वडिल आणि मुलगा. हे नाते घट्ट बांधून ठेवण्याचे काम आई करत असते. पण त्याच आईमुळे जर नात्यात दुरावा आला तर…? कोणत्याही नात्यात सुसंवाद महत्वाचा. पण संजू आणि त्याच्या बाबांचा तर कधी संवाद झालाच नाही. त्याच्या बाबांची ओळख त्याच्याच आईने लपवली. पण का..? कश्यासाठी..? याच प्रश्नांची उत्तर घेऊन येतोय ‘शॅार्ट अँण्ड स्वीट’ चित्रपट. या चित्रपटाची गोष्ट इतर चित्रपटांपेक्षा जरा वेगळी आणि खूप हटके आहे. नुकताच या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि त्यांच्या पसंतीस पडला आहे.
शुभम प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शक गणेश कदम आहेत. तर पायल गणेश कदम, विनोद राव निर्माते आहेत. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, हर्षद अटकरी, श्रीधर वत्सर आणि रसिका सुनील हे मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट येत्या ३ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ट्रेलरमध्ये संजूच्या मनात त्याच्या वडिलांना भेटण्याची तीव्र ओढ दिसत आहे. अचानक त्याची आई त्याच्या वडिलांचे सत्य त्याच्या समोर उघड करते आणि त्याच्यासाठी सगळं काही बदलून जातं.
संजूसमोर येणारी व्यक्ती त्याचे बाबा आहेत हे सत्य त्याला स्विकारता येत नाहीये. तो सगळ्यांपासून हे लपवण्याचा प्रयत्न करतोय. स्वतःशी झगडतोय, आईशी भांडतोय आणि परिस्थितीला कोसतोय. शेवटी दुखावलेला बाबा विचारात असताना संजुची आई त्यांना सांगते कि, ‘तुम्ही ना.. संजूचा बाप बनायचा प्रयत्न नका करू.. त्याला दाखवून द्या, वामन कोण आहे ते..’. यानंतर संजूचे बाबा असं काय करतील कि त्यांचं लेखासोबतचं नातं सुधारेल..? आईने इतक्या वर्षांपासून वडिलांची लपवलेली ओळख संजू स्वीकारणार का..? या प्रश्नाचे उत्तर पाहायला प्रेक्षकांना ३ नोव्हेंबर पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.