‘त्यो उदेभान जर शेर असलं तर…’; ‘सुभेदार’ चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वात गेल्या काही काळापासून एकापेक्षा एक जबरदस्त इतिहास सांगणारे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या चित्रपटांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाचे दर्शन घडले. असंच इतिहासाचं आणखी एक पान उलघडायला ‘सुभेदार’ हा चित्रपट येत आहे. प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’मधील ‘सुभेदार’ हा चित्रपट पाचवे पुष्प असून घोषणेपासून हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. नुकतेच या चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित झाले आहे.

आतापर्यंत शिवराज अष्टकातून ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ हे चार ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या चारही चित्रपटांना प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. यानंतर आता ‘श्री शिवराज अष्टका’तील पाचवा चित्रपट म्हणजेच ‘सुभेदार’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वीर कामगिरीवर आधारलेला आहे. या चित्रपटाचे नवे पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जे शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहलंय, ‘समद्या रहाळाला सांगा.. त्यो उदेभान जर शेर असलं तर राजांकडं त्याच्यापरिस सव्वाशेर हायती..’.

नुकतेच रिलीज झालेल्या या पोस्टरवर अजय पुरकर, समीर धर्माधिकारी आणि अभिजीत श्वेतचंद्र हे कलाकार पहायला मिळत आहेत. या तिघांच्याही डोळ्यात एक करारी बाणा दिसतोय. शिवाय डोक्यावर फेटा आणि पिळदार मिशीमुळे त्यांचा लूक आणखीच उठून दिसतोय. त्याचबरोबरच त्यांनी परिधान केलेल्या पांढऱ्या कुर्त्यावर रक्त लागल्याचे दिसत आहे. एकंदरच हे पोस्टर एखाद्या लढाईची आणि शूर वीर मावळ्यांच्या पराक्रमाची एक हलकी झलक दाखवत आहे. हे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.