ही तीच वाघनखं आहेत..? आस्ताद काळेने उपस्थित केली शंका; मागितला ठोस पुरावा


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। उभ्या महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखं आणि भवानी तलवार ब्रिटनमधून परत आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत, अशी मोठी घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. दरम्यान हि वाघनखे ब्रिटन येथून भारतात आणण्यासाठीचा सामंजस्य करार यशस्वीरित्या संपन्न केल्याबद्दल मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा त्यांच्या निवासस्थानी पर्णकुटी येथे सत्कार समारंभ करण्यात आला. यावेळी अनेक मराठी कलाकार इथे उपस्थित होते.

सुभाष घई, महेश कोठारे, जॅकी श्रॉफ, शरद केळकर, भारत गणेशपुरे, संदीप कुलकर्णी, सौरव गोखले, माधव देवचके, शिव ठाकरे, नूतन जयंत हे मराठी कलाकार यावेळी उपस्थित होते. अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुनगंटीवार यांचे अभिनंदन केले, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. पण मराठी अभिनेता आस्ताद काळेने मात्र सोशल मीडियावर याबाबत केलेली पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. आस्तादने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल फेसबुकवर हि पोस्ट शेअर केली आहे.

ज्यामध्ये त्याने लिहिलंय, ‘ ”वाघनखं” आपल्याकडे आली आहेत हे चांगलंच आहे. त्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन आणि आभार!! पण ती आपल्याला ”देऊन टाकली” नाही आहेत याची कृपया नोंद घ्यावी या ठिकाणी. जगातील सर्व संग्रहालयं एकमेकांना स्वतःकडच्या वस्तू अशाप्रकारे काही काळापुरती देतच असतात. प्रचंड मोठी रक्कम deposit म्हणून यासाठी घेतली जाते. कागदोपत्री खूप काटेकोर आणि कायदेशीर व्यवहार त्यासाठी केला जातो आणि एक प्रामाणिक शंका आहे. जाणकारांनी कृपया निरसन करावं. नतद्रष्ट अफझुल्याचं पोट फाडायला हीच वापरली होती, याचा ठोस काही पुरावा सादर झाला आहे का…? हे मी genuinely विचारतोय. पुन्हा सांगतो, हा ऐतिहासिक ठेवा आत्ता स्वगृही असल्याचा आनंद निश्चितच आहे’. आस्तादच्या या पोस्टवर अनेक नेटकरी प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.