‘.. अन टेंभी नाका स्तब्ध झाला’; धर्मवीर दिघेंच्या वेशभूषेत प्रसादने घेतले दुर्गेश्वरी देवीचे दर्शन


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटातून ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ आनंद दिघे यांचा जीवनप्रवास मोठ्या पडद्यावर उलघडण्यात आला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. यानंतर आता प्रेक्षक ‘धर्मवीर’ चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाची घोषणादेखील करण्यात आली आहे. दरम्यान ठाण्यातील टेंभीनाका परिसरात धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरु केलेल्या नवरात्र उत्सवात प्रसाद ओकने अष्टमीला धर्मवीर वेशात एंट्री केली आणि सगळे पाहतच बसले.

यंदा टेंभीनाक्याच्या दुर्गेश्वरी देवीच्या उत्सवासाठी राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. काल अष्टमीच्या निमित्ताने दुर्गेश्वरी देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. या भर गर्दीत रविवारी अष्टमीच्या दिवशी अचानक आरमाडा गाडी थांबली आणि भगवे वस्त्र परिधान केलेला आनंद दिघेंच्या रुपात अभिनेता प्रसाद ओक देवीच्या दर्शनासाठी पोहोचला. त्याला पाहून क्षणभर आनंद दिघेचं आल्याचे भासले आणि सगळे भाविक डोळे विस्फारून पाहतच राहिले.

प्रसाद ओकला प्रत्यक्ष आनंद दिघेंच्या रुपात पाहणं हा भाविकांसाठी आश्चर्याचा धक्का ठरला. प्रसाद देवीच्या मंडपात येताच सारे स्तब्ध झाले. देवीच्या दर्शनाला आलेली प्रत्येक माणसं त्याच्याकडे वळून वळून पाहत होती. यावेळी प्रसाद ओकने आनंद दिघेंच्या वेशभूषेतचं दुर्गेश्वरी देवीची अष्टमीची महाआरती केली. आरती करताना प्रसादच्या बाजूला काही लहान मुलंदेखील उभी होती. हा व्हिडीओ शेअर करत अभिनेता प्रसाद ओकने इंस्टाग्रामवर कृतज्ञता व्यक्त केली आहे.