औक्षण, केक अन धिंगाणा!! स्टार प्रवाहने साजरा केला आपल्या सिद्धूचा बड्डे; अभिनेता झाला भावुक


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता सिद्धार्थ जाधव याने केवळ अभिनयाच्या जोरावर सिने विश्वात भक्कम स्थान निर्माण केले आहे. केवळ मराठीच नव्हे तर बॉलिवूड सिनेविश्वातदेखील त्याने आपल्या अभिनयाची चांगलीच छाप पाडली आहे. उत्तम अभिनयाबरोबरच विनोदी शैलीमुळे सिद्धूचा चाहता वर्ग वाढला आहे. नुकताच सिद्धार्थचा वाढदिवस झाला. यानिमित्ताने ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या मंचावर लाडका होस्ट सिद्धार्थ जाधवचा वाढदिवस साजरा करण्यात आला. याचा व्हिडीओ स्टार प्रवाहच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आला आहे.

यावेळी मंचावर ‘मन धागा धागा जोडते नवा’ आणि ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतील कलाकार उपस्थित होते. उपस्थित महिला कलाकारांनी आधी सिद्धूचे औक्षण केले आणि त्यानंतर केक कापून त्याचे तोंड गोड केले. इतकेच नव्हे तर सिद्धार्थसोबत मालिकेच्या कलाकारांनी मस्त डान्स केला आणि असा सिद्धूचा वाढदिवस साजरा झाला. यावेळी सिद्धार्थचा संघर्ष ऐकून सगळेच भावुक झाले. तर आपल्यावरील प्रेम पाहून सिद्धूच्या डोळ्यात पाणी तरळले. यावेळी सिद्धार्थ म्हणाला, ‘प्रत्येक माणसाच्या आयुष्यात वेगवेगळे टप्पे असतात’.

‘माझ्या आयुष्यातले हे टप्पे मी खूप एन्जॉय करतो. आयुष्यात बऱ्याच गोष्टी शिकत गेलो. धडपडत गेलो, पडत गेलो पण उभा राहिलो. आनंद वाटण्याने आनंद मिळतो ही जी गोष्ट आहे, ती खूप महत्त्वाची आहे. मी नेहमीच म्हणतो, मी किती चांगला अभिनेता आहे, हे मला माहित नाही. पण मी प्रचंड नशीबवान अभिनेता आहे की मला त्या क्षणाला त्या लोकांचा सहवास मिळतो आणि माझं आयुष्य समृद्ध होतं. धन्यवाद. माझ्यासाठी हा क्षण खूप खास आहे. गेल्यावर्षी माझ्यासाठी महेश मांजरेकर केक घेऊन आले होते. माझे बाबा, दादा आणि आई आली होती. माहित नाही माझं नशीब काय आहे..? पण आता माझ्याबरोबर केक कापताना स्वरा आहे’.