इंदू डार्लिंगच्या 75’व्या वाढदिवसाला कोण कोण येणार..? ‘झिम्मा 2’चा टिझर रिलीज


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोरोनाच्या भीषण कलाकानंतर चित्रपटगृहात कल्ला करणारा ‘झिम्मा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटाने प्रेक्षकांना आणि समीक्षकांना चांगलीच भुरळ घातली. यानंतर आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती ‘झिम्मा २’ या चित्रपटाची. बस… वाट पाहण्याचे दिवस संपायला आता काहीच दिवस बाकी आहेत. कारण लवकरच बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘झिम्मा २’ येतो आहे. नुकताच या चित्रपटाचा एक टीझरदेखील प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये यंदाच्या पिकनिकचे ठोस कारण देण्यात आले आहे.

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर हा ‘झिम्मा’ या चित्रपटात अत्यंत महत्वपूर्ण भूमिकेत दिसला होता. तर आता तीच धमाल आणि तीच मजा घेऊन सिद्धार्थ पुन्हा एकदा आनंदाचा ‘झिम्मा’ घेऊन येतो आहे. नुकताच त्याने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर या चित्रपटाचा टिझर शेअर केला आहे. या टीझरची सुरुवात सिद्धार्थ पिकनिकचे प्लॅनिंग करतो आहे अशी होते. यावेळी सिद्धार्थ गेल्या चित्रपटात तयार केलेल्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर मेसेज करताना दिसतोय. तो लिहितो, ‘बायांनो, पुढच्या ट्रीपची तयारी करायला घ्या. कारण आहे इंदू डार्लिंगचा ७५ वा वाढदिवस. जो तिला आपल्याबरोबर साजरा करायचा आहे आणि तिच्याकडे एक सरप्राईज आहे’.

एव्हढं बोलून सिद्धार्थ फोन बाजूला ठेवतो आणि उठून जातो. सोबतच ‘काय हौस आहे मला..’ असे पुटपुटतो. हा टिझर पाहून आता स्त्री वर्गाची ‘झिम्मा २’बाबत असणारी उत्सुकता आणखीच वाढली आहे. येत्या २४ नोव्हेंबर २०२३ रोजी हा चित्रपट सर्वत्र सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. ‘झिम्मा’ या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, क्षिती जोग, मृण्मयी गोडबोले, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, अनंत जोग, चैत्राली गुप्ते हे कलाकार महत्वपूर्ण भूमिके होते. पण आता दुसऱ्या भागात इंदू डार्लिंगचा वाढदिवस साजरा करायला कोण कोण येणार..? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.