खूप मोठे SUPERSTAR व्हाल; किरण मानेंना तृतीयपंथीयांनी दिला भरभरून आशीर्वाद


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेते किरण माने हे सध्या ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत अभिमान साठे हि भूमिका साकारताना दिसत आहेत. याआधी त्यांनी साकारलेल्या भूमिकांइतकंच या भूमिकेला देखील प्रेक्षक प्रेम देत आहेत. दरम्यान आज दसऱ्याच्या निमित्ताने किरण माने यांनी अत्यंत लक्षवेधी पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी काही तृतीयपंथीयांसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. हे सर्व त्यांचे चाहते असल्याचे त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिताना घडलेला किस्साही सांगितला आहे.

किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे कि, ‘…आयुष्यात पहिल्यांदाच माझ्या अनोख्या चाहत्यांनी दसर्‍याच्या आदल्या दिवशीच माझा दिवस सोन्याचा केला! काल अचानक काही तृतीयपंथी लोक अत्यंत प्रेमानं, आवर्जुन, खास माझा पत्ता शोधत मला भेटायला आले. मला पाहून भारावून बोलू लागले, “किरणजी, तुमच्या भुमिका आमच्या काळजात कोरल्यात आम्ही. विलास पाटील आणि सिंधुताईंचे वडील पाहिल्यानंतर कायम वाटायचं असा बाप आम्हाला लाभायला पाहिजे होता. मलाही चिंधीसारखीच शिकायची आवड होती. बिगबाॅसमध्ये असताना तुम्हाला खूप व्होटिंग केलं आम्ही….” ऐकताना माझे डोळे पाणावत होते’.

‘खास माझ्यासाठी जेजुरीच्या खंडोबाच्या गाण्यावर त्यांनी डान्स केला. “आम्ही वरचेवर तुम्हाला भेटायला येऊ. प्रत्येक वेळी यशाची पायरी वर चढलेली दिसणार आहे आम्हाला. तुम्ही खूप खूप मोठे व्हाल… सुपरस्टार व्हाल. जगात नाव होईल. आमचे आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहेत.” असं म्हणून लाखमोलाचा आशिर्वाद देऊन गेले… बाकी कायबी असो भावांनो, ही अशी माया लै कमीजणांना लाभते. फॅन्सच्या ”लाईव्ह” प्रेमाबाबतीत मी लै लै म्हंजे लैच भाग्यवान हाय! कलाकार आहे मी. जसे चाहते आहेत, तसे काही निंदक, ट्रोलही आहेत… पण माझा द्वेष करणार्‍यांचा मला जरासुद्धा राग येत नाही… कारण त्यांच्यामुळंच तर माझ्या चाहत्यांच्या अफाट प्रेमाची किंमत किती मोलाची आहे, हे मला कळतंय. बहुत छोटे हैं मुझ से मेरे दुश्मन.. जो मेरे चाहनेवाले हैं, मुझ से बड़ॆ है! लब्यू..’