दिग्पाल लांजेकरांनी केली नव्या चित्रपटाची घोषणा; उलगडणार ज्ञानेश्वरांच्या कुटुंबाची गाथा


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर हे त्यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’ या चित्रपट मालिकेमूळे कायम चर्चेत असतात. या चित्रपट मालिकेच्या अंतर्गत आतापर्यंत ५ चित्रपुष्प श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी अर्पण करण्यात आली आहेत. या चित्रपटांमधून छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सरदारांचा सुवर्ण इतिहास मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आला. यानंतर आता दिग्पाल यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर आणखी एका नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.

इतिहासातील सुवर्ण पाने चित्रपटांमधून मोठ्या पडद्यावर मांडणारे लेखक आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आता आणखी एका थोर व्यक्तिमत्वाच्या जीवनावर आधारलेला चित्रपट घेऊन आहेत आहेत. या चित्रपटाचं नाव आहे ‘मुक्ताई.’ म्हणजेच या आगामी चित्रपटामधून दिग्पाल लांजेकर हे संत ज्ञानेश्वर यांची धाकटी बहीण मुक्ताई यांच्या नजरेतून ज्ञानेश्वरांच्या कुटुंबाची गाथा प्रेक्षकांसमोर आणणार आहेत. या चित्रपटाचे नुकतेच एक मोशन पोस्टर सोशल मीडियाच्या माध्यमातून रिलीज करण्यात आले आहे.

हे मोशन पोस्टर शेअर करत दिग्पाल लांजेकर यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, ‘नवे क्षितीज… नवे सीमोल्लंघन… कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आशीर्वादाने… संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांची चिमुकली पण आभाळ व्यापून उरणारी बहीण मुक्ताई … तिच्या दिव्यदृष्टीने पाहिलेली ज्ञानेश्वरांच्या दैवी कुटुंबाची कथा!’. माहितीवर, हा चित्रपट येत्या नव्या वर्षात म्हणजेच २०२४ च्या जून महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कोणकोणत्या कलाकारांची वर्णी लागली आहे हे अद्याप गुलदस्त्यात आहे.