माधुरी दीक्षितच्या नव्या मराठी सिनेमाची घोषणा; सोशल मीडियावर शेअर केले मोशन पोस्टर


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेविश्वाची धकधक गर्ल अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित ही मूळची महाराष्ट्रीयन आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये काम करत असतानासुद्धा तिची मराठीसोबत जोडलेली नाळ काही तुटली नाही. बॉलीवूडमध्ये आघाडीपथावर कार्यरत असताना मराठी सिनेसृष्टीसोबत असणारे नाते तिने कायम सांभाळले आहे. मराठी सिनेसृष्टीत तिने ‘बकेट लिस्ट’ या चित्रपटात काम केले होते. यानंतर आता तिने आणखी एका चित्रपटाची घोषणा केली आहे. ज्याचे नाव आहे ‘पंचक.

दसऱ्याचा शुभ मुहूर्त गाठत अभिनेत्री माधुरी दीक्षितने तिच्या आगामी नव्या मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘बकेट लिस्ट’ या चित्रपटानंतर माधुरी पुन्हा एकदा मराठी सिनेविश्वात झळकण्याची सज्ज झाली आहे. पण यावेळी माधुरी अभिनयातून नव्हे तर निर्मितीतून मराठी सिनेविश्व गाजवताना दिसणार आहे. माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने निर्मित आगामी मराठी चित्रपट ‘पंचक’चे एक मोशन पोस्टर त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रदर्शित केले आहे. जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या पोस्टरसोबत माधुरीने चित्रपटाच्या प्रदर्शनाची देखील तारीख जाहीर केली आहे. ‘पंचक’ या आगामी मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन जयंत जठार आणि राहुल आवटे करत आहेत. हा चित्रपट येत्या वर्षात ५ जानेवारी २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधीदेखील माधुरी आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी एक मराठी चित्रपट निर्मित केला होता. ज्याचे नाम ‘१५ ऑगस्ट’ असे होते. हा त्यांनी निर्मित केलेला पहिलाच मराठी चित्रपट होता. त्यानंतर आता मिस्टर आणि मिसेस नेने यांनी मिळून ‘पंचक’ हा दुसरा मराठी चित्रपट निर्मित केला आहे. ज्याबाबत दोघेही फार उत्सुक आहेत असे त्यांनी सांगितले.