‘धैर्य आणि न्यायाच्या शक्तिशाली कथनाची झलक’; ‘जयभीम पँथर’चे मोशन पोस्टर प्रदर्शित


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बहुजन तरुणांना नवी दिशा देण्यासाठी समाज प्रबोधनासाठी नवयान ड्रीम फिल्म प्रोडक्शन “जयभीम पँथर” एक संघर्ष या चित्रपटाची निर्मिती करत आहे. निशांत नाथाराम धापसे दिग्दर्शित या चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतेच अशोका विजयादशमीच्या मुहूर्तावर छत्रपती संभाजीनगर येथे लाँच करण्यात आलं असून, एका संघर्षाची कहाणी या चित्रपटातून मांडली जाणार आहे. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय किर्तीचे पु.भ. विशुद्धानंद बोधी महायेरे, मा. खा.इम्तियाज जलील, पोलिस आयुक्त मनोज लोहिया , श्रीमती सूर्यकांता गाडे, भीमराव हत्तीअंबीरे तसेच चित्रपटाचे निर्माते,दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ टीम उपस्थित होते.

https://www.instagram.com/reel/Cy0BcN7ot7j/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==

भ. शीलबोधी यांच्या नवयान ड्रीम फिल्म प्रोडक्शनद्वारे निर्मिती होत असलेला “जयभीम पँथर” एक संघर्ष हा महत्त्वाचा चित्रपट ठरणार आहे. आयु. रामभाऊ तायडे हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. संपूर्ण बौद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातील भारत निर्माण करण्यासाठी चित्रपट, मालिका अशा माध्यमातून नवनिर्मिती करण्याचा या निर्मिती संस्थेचा मानस आहे. लेखक दिग्दर्शक निशांत नाथाराम धापसे यांनी आतापर्यंत हलाल , भोंगा, भारत माझा देश आहे अशा अनेक चित्रपटांचे लेखक म्हणून, तर “अंकुश”, “रंगीले फंटर” हे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. त्यांच्या चित्रपटांना अनेक महोत्सवांमध्ये पुरस्कार, राज्य पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. नागराज दिवाकर हे छायाचित्रण, संकलन नीलेश गावंड, प्रकाश सिनगारे कलादिग्दर्शन यांचे असून राहुल सुहास यांचे या चित्रपटला संगीत लाभणार आहे. संतोष गाडे हे प्रोजेक्ट हेड तर बाबासाहेब पाटील हे कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहणार आहेत.

सध्याच्या सामाजिक कोलाहलात आताची पिढी अडकल्यास त्यांचे आयुष्य अयोग्य मार्गावर जाईल, त्यांचं वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्य उद्ध्वस्त होईल. त्यामुळे संविधानिक मूल्यांचं रक्षण होण्याच्या उद्देशानं जबाबदारीची जाणीव करून देणारं कथानक “जयभीम पँथर” एक संघर्ष या चित्रपटात मांडण्यात येणार असल्याचे निर्माते भदंत शीलबोधी यांनी सांगितले. चित्रपटाचं दमदार नाव, कसदार लेखक दिग्दर्शक यांची घोषणा झाली असली, तरी चित्रपटात कलाकार कोण असणार यासाठी मात्र अजुन थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.