दुःखद! ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांचे निधन; वयाच्या 90’व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातून अत्यंत दुःखद अशी बातमी समोर आली आहे. मराठी सिनेविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. या वृत्ताने संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांची कारकीर्द फार मोठी आहे. अगदी नाटकापासून विविध चित्रपटांमध्ये अनेक प्रकारच्या भूमिका साकारत त्यांनी मराठी सिनेविश्वाला भारावले होते. अभिनेत्री शांता तांबे यांच्या निधनावर अनेक मराठी कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ मराठी अभिनेत्री शांता तांबे यांचे आज दिनांक १९ जून २०२३ रोजी वयाच्या ९० व्या वर्षी अल्पशा आजाराने को्हापूर येथे राहत्या घरी निधन झाले. त्यांनी अनेक वर्ष मनोरंजन विश्वाची अविरत सेवा केली आहे आणि विविध माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यामुळे त्यांची एक्झिट ही नक्कीच मनोरंजन विश्वाची मोठी हानी आहे. त्यांनी गाजवलेल्या कलाकृती प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप पाडून गेल्या आहेत. सुरुवातील मराठी नाटकांमध्ये लहान लहान भूमिका साकारून त्यांनी आपल्या अभिनय विश्वातील कारकिर्दीची सुरुवात केली. पण पुढे त्यांनी अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत मराठी चित्रपटांमध्येही विविध भूमिका साकारल्या होत्या.

अनेक मराठी नाटकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पडल्यानंतर अनेक मराठी चित्रपटात त्या दिसल्या होत्या. यांपैकी ‘मोहित्याची मंजुळा’, ‘मर्दानी’, ‘सवाल माझा ऐका’, ‘आई पाहिजे’, ‘बाई मोठी भाग्याची’, ‘मोलकरीण’, ‘दोन बायका फजिती ऐका’ या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. तब्बल ७ दशकं शांता तांबे यांनी अभिनय क्षेत्रात काम केले आहे. त्यानंतर उतरत्या वयामुळे त्यांनी अभिनय क्षेत्रातुन ब्रेक घेतला होता. यानंतर त्या कोल्हापूरातील त्यांच्या घरी राहत होत्या. झी मराठीची गाजलेली मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’मध्येही त्या एका लहानशा भूमिकेत दिसल्या होत्या.