प्रसाद- अमृताने लग्नाआधीच घेतलं नवं घर..?; दारावरच्या नेमप्लेटमुळे चर्चांना उधाण


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस मराठी 4’च्या माध्यमातून अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेत्री अमृता देशमुख यांची भेट झाली. हि भेट, मैत्रीत आणि त्यांची मैत्रीत प्रेमात रूपांतरित झाली. त्यांच्या केमिस्ट्रीवर प्रेक्षकांनी पसंतीची मोहोर लावल्यानंतर घरातून बाहेर पडल्यावर या जोडीने गुपचूप साखरपुडा उरकत सगळ्यांना आनंदाचा धक्का दिला. या वर्षात २२ जुलै २०२३ रोजी प्रसाद – अमृता यांचा साखरपुडा झाला. यानंतर आता लवकरच ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहे. तत्पूर्वी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोमुळे त्यांनी लग्नाआधीच घर खरेदी केल्याची चर्चा सुरु झाली आहे.

अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेत्री अमृता देशमुख हे १८ नोव्हेंबर २०२३ रोजी लग्न करणार आहेत. तशी या दोघांनी अधिकृत माहिती दिली आहे. दरम्यान, विजयादशमीच्या मुहूर्तावर प्रसाद – अमृता यांनी शेअर केलेल्या फोटोमुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत. प्रसाद – अमृताच्या लग्नाला आता काहीच दिवस उरले आहेत. असे असताना त्यांनी दसऱ्याचा शुभ मुहूर्तावर शेअर केलेले फोटो नव्या चर्चेचे कारण ठरले आहेत. या फोटोत प्रसाद – अमृता पारंपरिक लूकमध्ये दिसत आहेत. त्यांनी हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

ज्यामध्ये हे जोडपं एका नव्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ उभं आहे. तर बाजूला दोघांच्या नावाच्या पाट्या लावलेल्या आहेत. या नेमप्लेटवर प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख अशी ठळक मराठीत नाव लिहिलेली दिसत आहेत. दरवाज्याच्या बाजूला प्रसाद- अमृताच्या नावाची नेमप्लेट पाहून लग्नाआधी दोघांनीही नवीन घर घेतल्याची चर्चा सुरु झाली आहे. नेटकऱ्यांनी या फोटोंवर, ‘राजकुमार- राजकुमारी आणि त्यांचं घर’, ‘नवीन घरासाठी शुभेच्छा’, ‘अनेक उत्तम आशिर्वाद.. खूप प्रगती करा’ अशा कमेंट्स करत या जोडप्याबाबत आनंद व्यक्त केला आहे.