‘सहकुटुंब सहपरिवार’ फेम अभिनेत्रीची माधुरी दीक्षितच्या चित्रपटात वर्णी


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेविश्वाची धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षित ही मूळ महाराष्ट्रीयन असल्यामुळे तीचं मराठी सिनेविश्वासोबतदेखील घट्ट नातं आहे. बॉलीवूडमध्ये आघाडीपथावर कार्यरत असतानाही ती मराठी सिनेसृष्टीसोबतचे नाते कायम सांभाळताना दिसते. नुकतीच दसऱ्याच्या मुहूर्तावर तिने नव्या एका मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. ज्याचे नाव आहे ‘पंचक आणि या चित्रपटाची निर्मिती माधुरी व तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी केली आहे. या चित्रपटात ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील एक अभिनेत्री दिसणार असल्याचे नुकतेच समोर आले आहे.

दसऱ्याच्या मुहूर्तावर माधुरी दीक्षितने स्वतःच निर्मिती केलेल्या ‘पंचक’ या मराठी चित्रपटाची घोषणा केली. यासोबत तिने चित्रपटाचे मोशन पोस्टरदेखील रिलीज केले. यानंतर आता ‘पंचक’ या चित्रपटात कोणकोणते कलाकार दिसणार ते समोर आले आहे. ज्यामध्ये अभिनेता आदिनाथ कोठारे, सतीश आळेकर, दीप्ती देवी यांच्यासह स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेतील सरू म्हणजेच अभिनेत्री नंदिता पाटकरदेखील झळकणार आहे. तिने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर ‘पंचक’ चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे.

काही महिन्यांपूर्वी ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेने निरोप घेतला. मात्र मालिकेतील मुख्य पात्र अंजी, पशा, सूर्या, सरू, वैभ्या, अवनी, ओंकार ही मात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली. यांपैकी सरू म्हणजेच अभिनेत्री नंदिता पाटकर आता माधुरी दीक्षितच्या ‘पंचक’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता नंदिताचे चाहते प्रचंड खुश झले आहेत. या चित्रपटात ती कोणत्या भूमिकेत दिसणार आहे..? हे अजून समोर आलेले नाही. मात्र लवकरच ती एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. माधुरी दीक्षितचा ‘पंचक’ हा मराठी चित्रपट ५ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.