हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला कॉमिक कार्यक्रम म्हणजेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने अनेक विनोदवीर प्रेक्षकांच्या भेटीस आणले. ते सादर करत असलेली प्रहसने जितकी खळखळून हसवतात तितकीच सामाजिक संदेश देतात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून फिल्टरपाड्याचा बच्चन म्हणजेच अभिनेता गौरव मोरे प्रकाश झोतात आला. आपल्या कमालीच्या कॉमिक टायमिंगच्या जोरावर त्याने प्रेक्षकांच्या मनात स्वतःसाठी जागा निर्माण केली. नुकतेच त्याने एका कार्यक्रमात प्रेक्षकांविषयी एक विधान केलं आहे, ते चर्चेत आलं आहे.
शारदा प्रकाशन प्रकाशित अमोल मोहन निरगुडे यांच्या ‘झटपट करोडपती कसे व्हावे’ या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन अलीकडेच पार पडले. डोंबिवलीतील सर्वेश हॉल येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता गौरव मोरे प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहिला होता. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘बॉईस ४’च्या माध्यमातून गौऱ्या कॉमिक मात्र वेगळ्या ढंगाची भूमिका साकारताना दिसला. हा चित्रपट कॉमेडी जॉनरचा असूनही प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद त्याला मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर गौरवने केलेले एक विधान सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
प्रकाश सोहळ्यादरम्यान अभिनेता गौरव मोरे याने खंत व्यक्त करताना म्हटले कि, ‘मराठी चित्रपटांच्या दुरवस्थेला मराठी प्रेक्षकच जबाबदार आहेत. इतर प्रादेशिक भाषेत येणारे चित्रपट मात्र सुपरहिट होतात. तेथील स्थानिक कलावंत एका रात्रीत सुपरस्टार होतात. याचे कारण त्या त्या भाषेतील लोक आपल्या भाषेतील चित्रपट आवर्जून पाहतात. मात्र मराठी चित्रपट आपलेच मराठी प्रेक्षक पाहत नाहीत. त्यामुळे कलावंत म्हणून वाईट वाटते.
मराठी अभिनेते जेव्हा हिंदी किंवा इतर प्रादेशिक भाषेत जेव्हा दुय्यम भूमिका करतात तेव्हा आपलेच प्रेक्षक त्यांच्यावर टीका करतात, हे अयोग्य आहे. मराठी कलावंतांमध्ये अभिनयाची क्षमता जबरदस्त असूनही अनेक वर्ष स्ट्रगल करण्यातच जातात. मराठी प्रेक्षक भाषेचा अभिमान बाळगून जाणीवपूर्वक चित्रपट पाहतील तेव्हाच मराठी चित्रपटसृष्टीला सुगीचे दिवस येतील’.