हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संपूर्ण समाजाला ज्ञानतेजाने उजळून टाकण्याचे काम करणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य फार मोठे आहे. अज्ञानाला ज्ञानाचे महत्व पटवून देणाऱ्या या महान व्यक्तिमत्वाच्या आयुष्यावर आधारित लवकरच एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘सत्यशोधक’ असे आहे. यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आयुष्यातील अडीअडचणी आणि त्यांनी पुरोगामी विचारांची मांडणी कशी केली..? ते स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ कशी रोवली..? या प्रत्येक महत्वाच्या प्रसंगांचे वर्णन केले जाणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
महात्मा ज्योतिबा फुले यांचा जीवन प्रवास आता या चित्रपटाच्या माध्यामातून मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची केवळ चर्चा होती. पण आता चित्रपटाचे पोस्टर समोर आल्याने उत्सुकता बळावली आहे. विशेष सांगायचे म्हणजे, हा चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सुरुवातील या चित्रपटामध्ये ज्योतिबा फुलेंच्या भूमिकेत कोण दिसणार..? असे प्रेक्षकांकडून वारंवार विचारले जात होते. पण आता पोस्टर समोर आल्यानंतर हि भूमिका संदीप कुलकर्णी यांच्या पदरी पडल्याचे स्पष्ट झाले आहे. तर राजश्री देशपांडे सावित्री माईंची भूमिका साकारणार आहेत.
सोशल मीडियावर या चित्रपटाचे पोस्टर तुफान व्हायरल होत असून संदीप कुलकर्णी यांना महात्मा फुलेंच्या भूमिकेत प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. माहितीनुसार, या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात १९ व्या शतकाच्या सुरुवातीचा काळ दाखण्यात येणार आहे. यासाठी वी.एफ.एक्सच्या आधुनिक तंत्राचा वापर करण्यात आला आहे. गतवर्षी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. तेव्हापासून सुरु असलेल्या चर्चांना आता पोस्टर रिलीजमुळे पुन्हा एकदा चालना मिळाली आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी ५ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार असे सांगितले जात आहे.