‘पिल्लू बॅचलर’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीला; कधी होणार रिलीज..? जाणून घ्या


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एका अत्यंत वेगळ्या शिर्षकासह प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करणारा ‘पिल्लू बॅचलर’ हा नवा चित्रपट दिवाळीनंतर आपल्या भेटीस येत आहे. नुकताच हा चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार हे समोर आले आहे. त्यानुसार ‘पिल्लू बॅचलर’ हा चित्रपट येत्या ८ डिसेंबर २०२३ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटातून एक भली मोठी तगडी स्टारकास्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत अभिनेता पार्थ भालेराव दिसणार आहे.

वर्षा पाटील, सुनील फडतरे, अभिजित देशपांडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्म्सतर्फे या चित्रपटाची प्रस्तुती करण्यात आली आहे. अरविंद जगताप लिखित या चित्रपटाचं दिग्दर्शन तानाजी घाडगे यांनी केलं आहे. यापूर्वी तानाजी घाडगे यांनी बस्ता, बरड असे उत्तम चित्रपट दिले आहेत. मंगेश कांगणे यांनी गीतलेखन, चिनार महेश यांनी संगीत दिग्दर्शन, सूर्या मिश्रा यांनी छायांकन, अनंत कामथ यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. चित्रपटात पार्थ भालेराव, सायली संजीव, अक्षया देवधर, शशांक शेंडे, डॉ. मोहन आगाशे असे उत्तमोत्तम कलाकार आहेत.

विनोदी अंगानं जाणारी एक हलकीफुलकी कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. नावावरून प्रेमकथा असल्याचा अंदाज बाधता येतो, पण तरीही कथा काय असेल यांचं कुतूहल आहे. त्याशिवाय उत्तम कलाकार, दूरदृष्टी असलेला दिग्दर्शक, उत्कृष्ट गाणी आणि तांत्रिकदृष्ट्या भक्कम असलेल्या या चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली आहे. मात्र त्यासाठी ८ डिसेंबरपर्यंत वाट पहावी लागणार आहे.