माझी ‘मन्नत’ पूर्ण झाली..!! SRK’च्या वाढदिवशी पृथ्वीकची स्वप्नपूर्ती; दिली आनंदाची बातमी


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाला आहे. तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसवणारे विनोदवीर त्यांच्या कुटुंबाचा एक भाग झाला आहेत. यांपैकी एक म्हणजे पृथ्वीक प्रताप. २ नोव्हेंबर रोजी जगभरात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा वाढदिवस साजरा केला गेला. त्याचे चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसले. पृथ्वीक देखील शाहरुखचा मोठा चाहता आहे हे काही नव्याने सांगायला नको. पण आवडत्या अभिनेत्याच्या वाढदिवशी पृथ्वीकची स्वप्नपूर्ती झाल्याचा आनंद त्याने शेअर केला आहे.

अभिनेता पृथ्वीक प्रतापने स्वतःचं हक्काचं घरं घेतलं आहे आणि याचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर करत लिहीलं कि, ‘आजवर अनेक स्वप्न पाहिली… अनेक पूर्ण केली…अनेक स्वप्न जगली आणि अनेक स्वप्न भंगली सुद्धा, पण एक स्वप्न जे आजपर्यंत हुलकावणी देत होतं ते पूर्णत्वाला आलं…आयुष्याची ३० वर्षे आश्रितासारखी काढलेल्या प्रत्येकाला एक दहा बाय दहाचं छप्पर ही आभाळापेक्षा कमी नसतं…आज स्वतःच्या घरापुढे उभं राहून हा फोटो काढताना खरच आभाळ ठेंगण झाल्यासारखं वाटतंय. घर छोटं आहे पण माझ्या कुटुंबाचं आहे. ही स्वप्नपूर्तीची वाटचाल अजून अशीच सुरू राहणार आहे कारण ‘Penthouse’ अभी बाकी है मेरे दोस्त…!’

पुढे लिहिलंय, ‘गंमत म्हणजे आज २ नोव्हेंबरला हे घर माझ्या नावावर झालंय म्हणजे ‘शाहरुख खान’च्या वाढदिवशी. त्यामुळे माझी ‘मन्नत’ पूर्ण झाली असं म्हणायला हरकत नाही’. पृथ्वीकची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावर नेटकरी आणि मंडळी प्रतिक्रिया देत पृथ्वीकवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. रुचा आपटे, सुयश टिळक, निखिल बने, अश्विनी कासार, स्वानंदी टिकेकर, प्रथमेश परब, अक्षर केळकर, ऋतुजा बागवे या आणि अशा अनेक कलाकार मंडळींनी पृथ्वीकवला नव्या घरासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.