हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच झी मराठी वाहिनीवर सुरु झालेली ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ हि मालिका अगदी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. या मालिकेतील अक्षरा, अधिपती, भुवनेश्वरी ही तीन मुख्य पात्र आणि त्यांचा अभिनय प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्याचे मुख्य कारण ठरले आहे. शिवाय मालिकेचे कथानकदेखील चांगेलच रंगात आले आहे.
या मालिकेत अक्षराची बहीण इराची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. या अभिनेत्रीला तिच्या रिअल लाइफ बॉयफ्रेंडने तिला फिल्मी अंदाजात प्रपोज केलं आहे आणि याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतील इरा म्हणजेच अभिनेत्री रुता काळे ही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. त्यामुळे या माध्यमातून ती वेगवेगळ्या पोस्ट शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहते. ती साकारत असलेली इरा प्रेक्षकांना फार आवडते आहे. दरम्यान, रुता तिच्या भूमिकेमुळे नव्हे तर वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. रुताला एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने अगदी रोमँटिक अंदाजात लग्नासाठी मागणी घातली आहे. रुताने या गोड क्षणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत जाहीरपणे प्रेमाची कबुली दिली आहे.
अभिनेत्री रुता काळे आणि प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक अभिषेक लोकनर हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. यानंतर अखेर अभिषेकने तिला स्वतःच्या गुडघ्यावर बसून फिल्मी अंदाजात रोमँटिक प्रपोज केलं आहे. या गोड क्षणाचे टिपलेले फोटो रुताने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिलं, ‘सोबतच आता आणि कायमस्वरुपी’. या फोटोंवर नेटकऱ्यांनी अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. ‘पंधरवडा’, ‘अनवट’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेकने केले होते आणि यामध्ये रुताने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.