अक्षया देवधर आणि सायली संजीवची एकाच चित्रपटात वर्णी; साकारणार महत्वाच्या भूमिका


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री सायली संजीवने मालिका, चित्रपटांमधून विशेष पसंती मिळवली आहे. तर अक्षया देवधर हि मालिका विश्वातील प्रसिद्ध चेहरा आहे. या दोन्ही लोकप्रिय अभिनेत्री आपल्याला आताएकाच चित्रपटात पहायला मिळणार आहेत. या चित्रपटाचे नाव आहे ‘पिल्लू बॅचलर’. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. तर आता हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाल्याचे समोर आले आहे. एक हलकीफुलकी कॉमेडी घेऊन हा चित्रपट येत्या दिवाळीनंतर प्रदर्शित होणार आहे.

अनोख्या शीर्षकाचा ‘पिल्लू बॅचलर’ हा चित्रपट एक नवीकोरी गोष्ट घेऊन आपल्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात अभिनेता पार्थ भालेराव, सायली संजीव, अक्षया देवधर, शशांक शेंडे आणि डॉ. मोहन आगाशे हे प्रसिद्ध चेहरे एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. नावावरून हा चित्रपट प्रेमकथेवर आधारलेला असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. प्रेक्षकांसाठी सायली संजीव आणि अक्षया देवधर या आघाडीच्या अभिनेत्रींना एकत्र एकाच चित्रपटात पाहण्याची मोठी उत्सुकता आहे.

अक्षया देवधर ही ‘तुझ्या जीव रंगला’ या मालिकेतील मुख्य भूमिकेमुळे प्रचंड प्रसिद्धी झोतात आली. तर अभिनेत्री सायली संजीव ही ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून आणि ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटामुळे प्रसिद्धी झोतात आली. येत्या काळात सायलीचा ‘झिम्मा २’ हा चित्रपट देखील प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे.

‘पिल्लू बॅचलर’ हा चित्रपट ८ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन तानाजी घाडगे यांनी केले आहे. तर वर्षा पाटील, सुनील फडतरे, अभिजित देशपांडे यांनी निर्मिती सूत्र सांभाळली आहेत.