साताऱ्यात ‘या’ ठिकाणी उभारणार सुभेदार तानाजी मालुसरेंची समाधी; प्रसिद्ध दिग्दर्शकाने दिला ‘स्वराज्य निधी’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अवघ्या महाराष्ट्राचे आद्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास प्रचंड मोठा आहे. रोमांचकारी, अंगावर शहारे आणणारा आणि अतिशय जाज्वल्य असा हा इतिहास दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘शिवराज अष्टक’मधून ते भव्य रुपेरी पडद्यावर आपल्या भेटीस घेऊन येत आहेत. आतापर्यंत ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ आणि ‘शेर शिवराज’ अशी इतिहासातील चार सुवर्ण पाने उलघडल्यानंतर लवकरच पाचवे पुष्प ‘सुभेदार’ हा चित्रपट येऊ घातला आहे. यामधून दिग्पाल सातत्याचे इतिहासाचा आणि शिवकार्याचा प्रचार करत आहेत.

दिग्पाल लांजेकर यांची छत्रपती शिवाजी महाराजांप्रती असणारी निष्ठा ही सर्वश्रुत आहे. ते आपल्या प्रत्येक कृतीतून शिवकार्याचा प्रसार करत असतात. नुकतेच, ऐतिहासिक वारसाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी त्यांनी सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या जन्मगावी म्हणजेच सातारा जिल्ह्यातील गोडवली गावात सुरु असलेल्या सुभेदारांच्या स्मारकाच्या उभारणीसाठी ‘स्वराज्य निधी’ दिल्याचे समोर आले आहे. श्रमिकजी चंद्रशेखर गोजमगुंडे यांच्या ‘सहयाद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान’ संस्थेच्या पुढाकारातून हे काम सुरु आहे. ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या सुभेदार तान्हाजी काळोजीराव मालुसरे सभागृहाबाहेर या समाधीचे आणि स्मृतीस्थळाचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे.

याआधीदेखील किल्ले प्रतापगडाच्या डागडुगीकरणासाठी तसेच वीर मुरारबाजी देशपांडे यांच्या समाधीसाठीही त्यांनी पुढाकार घेत खारीचा वाटा उचलला आहे. याविषयी बोलताना दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर म्हणाले, ‘छत्रपतींच्या विचारांचा जागर आजच्या आणि पुढच्या पिढीसाठी कायम रहावा म्हणून नेहमीच प्रयत्नशील राहणे ही मी माझी सामाजिक बांधिलकी समजतो. आपल्यापैकी प्रत्येकाने हा विचार आपल्या मनात आणि ध्येयात रुजवायला हवा. नरवीर तान्हाजी मालुसरे यांचे हे स्मृतिस्थळ सर्वांसाठी वंदनीय ठरेल आणि पुढील पिढयांना प्रेरणा देत राहील असा मला विश्वास आहे’.