परदेशात मराठी पोरींचा कल्ला..; ‘झिम्मा 2’मधील नव्या रूपात बाईपण जपणारं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जिओ स्टुडिओज, आनंद एल राय प्रस्तुत आणि कलर येल्लो प्रॉडक्शन्सच्या सहयोगाने सादर होत असलेला चलचित्र कंपनी निर्मित ‘झिम्मा २’ हा चित्रपट २४ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. अलीकडेच रिलीज झालेल्या या चित्रपटाच्या टिझरने ‘झिम्मा’मय वातावरण निर्माण केलय. हेच वातावरण अधिक बहरवण्यासाठी आता चित्रपटातील पार्टी अॅंथम ‘मराठी पोरी’ हे पहिले वहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. क्षितिज पटवर्धन यांचे बोल लाभलेल्या या गाण्याला अमितराज यांनी संगीत दिले असून गाण्याला आदर्श शिंदे, वैशाली सामंत आणि मुग्धा कऱ्हाडे यांचा आवाज लाभला आहे.

‘मराठी पोरी’ या दोन शब्दांमध्येच पूर्ण गाण्याचा भावार्थ कळतोय. ‘इंदू’च्या ७५व्या वाढदिवसाचे हे सेलिब्रेशन असून यात प्रत्येकीचा जबरदस्त स्वॅग दिसत आहे. ‘मराठी पोरी’ हे गाणे प्रत्येकाला थिरकायला लावणारे असून एकंदरीत सर्व स्त्रियांच्या स्वभावाची खासियत या गाण्यातून सांगितली आहे. तसेच कलाकारांच्या वेशभूषेने या गाण्यात अधिकच रंगत आणली आहे. ‘मराठी पोरी’ हे ऐकायला जितके श्रवणीय आहे तितकेच ते डोळ्यांनाही सुखावणारे आहे. अतिशय एनर्जीने भरलेले हे गाणे नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल.

गाण्याबद्दल संगीतकार अमितराज म्हणतात, ”प्रत्येकीची खासियत सांगणारे हे गाणे आहे. मुळात हे सेलिब्रेशनचे गाणे असल्याने तशा मूडचे संगीत असणे फार आवश्यक होते आणि त्या मूडला साजेसे असेच संगीत आम्ही दिले आहे. यातील कलाकारच इतके भन्नाट आहेत की, संगीतही त्या गाण्याला तितक्याच ताकदीचे हवे होते. क्षितिजच्या गाण्याचे बोलही खूप सुरेख आहेत. ज्यातून प्रत्येकीची ओळख होत आहे. मुळात या सात जणी म्हणजे इंद्रधनूतील सात रंग आहेत आणि हे सात रंग एकरूप झाल्याचा फील या गाण्यातून येतोय. मला खात्री आहे, हे गाणे करताना आम्हीही खूप एन्जॉय केले आहे. त्यामुळे प्रेक्षकही हे गाणे मनापासून एन्जॉय करतील.”