‘गार्लिक ब्रेड, पास्ता आणि..’; अभिषेक- कृतिकाने केलं प्रसाद- अमृताचं कॉन्टिनेंटल केळवण


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठी सीजन चारच्या माध्यमातून प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. येत्या १८ नोव्हेंबर २०२३ रोजी अमृता आणि प्रसाद यांच्या लग्नाचा मुहूर्त योजिला आहे. मराठी मनोरंजन सृष्टीतील हि अत्यंत लोकप्रिय जोडी आहे. सध्या या दोघांच्या केळवणाचे कार्यक्रम पार पडत आहेत. कुटुंबीय आणि मित्र परिवाराकडून अमृता आणि प्रसादच्या केळवणाचा न्यारा थाट पहायला मिळतो आहे.

अशातच नुकतंच ‘आई कुठे काय करते’फेम अभिनेता अभिषेक देशमुख आणि त्याची पत्नी कृतिका यांनी प्रसाद- अमृताच्या केळवणाचा घाट घातला होता. अत्यंत वेगळ्या पद्धतीने त्यांनी प्रसाद- अमृतच कोडकौतुक केलं. अभिषेक- कृतिकाने प्रसाद- अमृताला केळवणासाठी त्यांच्या घरी आमंत्रित केलं होतं. यावेळी त्यांनी केळवणासाठी खास इटालियन बेत केला होता. मेन्यूमध्ये गार्लिक ब्रेड आणि पास्ता आवर्जून बनवला होता. प्रसाद आणि अमृताने या खास इटालियन केळवणाचे फोटो त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

प्रसाद आणि अमृता दोघांनीही त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर या खास केळवणाचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी उखाणादेखील घेतल्याचे आपण पाहू शकतो. प्रसाद अमृतासाठी उखाणा घेत म्हटले, ‘केळवणासाठी केलाय अभिषेक आणि कृतिकानं इटालियन ग्रार्लिक ब्रेड; अमृताचं नाव घेतो जोडतोय नात्याचा ट्रेंड’. तर अमृताने उखाणा घेत म्हटले, ‘अभिषेक आणि कृतिकाने कॉन्टिनेन्टल केळवण करून दिलाय आम्हाला पास्ता संसार सुरु झालाय वाटत आता कारण प्रसादचं नाव घेते खातोय आम्ही खस्ता…’. प्रसाद- अमृताच्या केळवणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.