आमिर खानच्या लेकीचं मराठमोळं केळवण; आयराच्या भन्नाट उखाण्यांचे व्हिडीओ व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेविश्वाचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या लेकीमुळे चर्चेत आहे. येत्या काहीच दिवसांत आमिरची लेक आयरा खान लग्नबंधनात अडकणार आहे. आयराचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लवकरच ती लग्नगाठ बांधणार आहे. तत्पूर्वी आयरा आणि नूपुरच्या लग्नाआधीचे सोहळे सुरु झाले आहेत. नुकतेच दोघांचे केळवण पार पडले. एक नव्हे तर दोन आणि ते हि मराठमोळ्या पद्धतीने. यावेळी आयराने आवर्जून तिच्या होणाऱ्या पतीसाठी उखाणे घेतले. ज्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

आयरा आणि नुपूर यांच्या केळवणाचे व्हिडीओ त्यांनी अधिकृत सोशल मीडियावर शेअर केले आहेत. साखरपुड्यानंतर आयरा आता हळूहळू मराठी शिकते आहे. याचा प्रत्यय तिने घेतलेल्या उखाण्यांमधून आला आहे. आयराने तिच्या अधिकृत सोशल मीडियावर शेअर केलेल्या पहिल्या केळवणाच्या व्हिडिओत तिने गुलाबी साडी परिधान केली आहे आणि त्यासोबत नाकात नथसुद्धा घातली आहे. नूपुरला घास भरवताना तिने उखाणा घेत म्हटलं कि, ‘मला मराठी येत नाही पण, पपॉयसाठी मी कधीच नाही म्हणत नाही’. तिचा हा उखाणा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अशातच आता त्यांच्या दुसऱ्या केळवणाचे फोटो आणि व्हिडीओ देखील समोर आला आहे. ज्यामध्ये आयराने मस्त नऊवारी साडी परिधान केली आहे. नाकात नथ, केसांचा अंबाडा, फुलांचे दागिने आणि हातात हिरव्या बांगड्या असा तिने लूक केला आहे. ज्यात ती फार सुंदर दिसते आहे. या दुसऱ्या केळवणाच्या निमित्ताने आयराने पुन्हा एकदा नुपूरसाठी उखाणा घेतला. ती म्हणाली, ‘आता मला मराठी येते आणि मी पपॉयला घेऊन जाते’. आयरा तिच्या होणाऱ्या पतीला म्हणजेच नूपुरला प्रेमाने पपॉय असे म्हणते. दरम्यान आमिरने सांगितल्याप्रमाणे येत्या वर्षी ८ ते ९ जानेवारीमध्ये आयरा आणि नुपूरचं लग्न उदयपूरमध्ये होणार आहे. त्यापूर्वी हे जोडपं कोर्ट मॅरेज करणार आहे.