अमृता धोंगडेचे निर्मिती क्षेत्रात पदार्पण; पहिल्याच चित्रपटात घेतली दमदार स्टारकास्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री अमृता धोंगडे ही ‘मिसेस मुख्यमंत्री’ या कार्यक्रमातून प्रकाश झोतात आली. त्यानंतर अमृताने ‘बिग बॉस मराठी सीजन 4’ गाजवला. या कार्यक्रमातून अमृता खरी प्रसिद्धीझोतात आली. तिचा ठसकेबाज अंदाज आणि दमदार व्यक्तिमत्व प्रेक्षकांना भावलं. अभिनयात आपली जादू दाखवल्यांनतर आता अमृताने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. ‘फौज द बॅटल ऑफ हिल’ या चित्रपटाच्या माध्यमातून अमृता धोंगडे निर्माती म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. अमृता निर्मिती करत असलेल्या या पहिल्याच चित्रपटाची स्टारकास्ट मात्र चांगलीच तगडी आहे.

अमृता धोंगडे निर्मित ‘फौज द बॅटल ऑफ हिल’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर अलीकडेच रिलीज झाले आहे. या लॉन्च सोहळ्यातील काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. १९७१ मध्ये भारत- पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धावर ‘फौज द बॅटल ऑफ हिल’ हा चित्रपट आधारित आहे. या युद्धात भारताच्या विजयी झेंड्याची घोषणा करण्यात आली. तसेच बांग्लादेश या नवीन देशाची स्थापनाही झाली. या सगळ्यात बलिदान दिलेल्या शूरवीर सैनिकांची शौर्यगाथा या चित्रपटाच्या माध्य्मातून मोठ्या पडद्यावर दाखवण्यात येणार आहे.

स्वामी चरण फिल्म्स, एम एन तातुसकर फिल्म्स प्रॉडक्शन, हर्ष जोशी प्रॉडक्शन निर्मित ‘फौज द बॅटल ऑफ हिल’ या चित्रपटाचे मयूर तातुसकर, कुशन जोशी, महेश करवंदे ( निकम), निलेश रमेश चौधरी आणि अमृता धोंगडे हे निर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार करत आहेत. मुख्य म्हणजे या चित्रपटात अशोक समर्थ, किरण गायकवाड, सोमनाथ अवघडे आणि उत्कर्ष शिंदे हे तगडे कलाकार मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. माहितीनुसार, हा चित्रपट येत्या वर्षात म्हणजेच २०२४ मध्ये प्रदर्शित होत आहे. मात्र मोशन पोस्टरमुळे आतापासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.