‘मी कामात खूप गुंतलेली आहे पण..’; मास्तरीणबाई ‘अशी’ साजरी करणार दिवाळी


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत मास्तरीण बाई म्हणजेच अक्षरा हे पात्र साकारून अभिनेत्री शिवानी रांगोळेने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. ही मालिका सध्या तुफान चर्चेत आली आहे. यंदाच्या ‘झी मराठी पुरस्कार’ सोहळ्यात या मालिकेने सर्वाधिक पुरस्कार पटकावले. सध्या छोट्या पडद्यावर हि मालिका लोकप्रिय ठरली आहे. शिवानीला आता सगळेच मास्तरीणबाई बाई म्हणून ओळखू लागले आहेत. दरम्यान शिवानीने यंदाची दिवाळी कशी साजरी करणार..? याबद्दल खुलासा केला.

अलीकडेच एका नामवंत वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री शिवानी रांगोळीने यंदाची दिवाळी कशी साजरी करणार याबद्दल सांगितले आहे. शिवानी म्हणाली की, ‘माझ्यासाठी दिवाळीची आठवण म्हणजे माझ्या तीन मावशा आणि आम्ही सर्व भावंडं एकत्र येऊन फराळ बनवायचो. त्या सगळ्या गोष्टी मी फार मिस करते. यंदा मी कामात खूप गुंतलेली आहे पण, सुट्टी मिळाल्यावर सगळ्यात आधी मी आणि विराजस पुण्याला जाणार आहोत. कारण, माझं माहेर आणि सासर दोन्ही पुण्यातच आहे.

पुढे म्हणाली कि, ‘मालिकेच्या व्यग्र वेळापत्रकामुळे जर मला सुट्टी मिळाली नाही, तर मुंबईतच मी माझ्या सगळ्या मित्र मंडळींना घरी फराळासाठी बोलवणार आहे. मला फक्त दिवाळीची नव्हे तर भाऊबीजेची पण उत्सुकता असते कारण तो एक दिवस आहे जेव्हा आम्ही सगळी भावंडं व्हिडीओ कॉलवर एकत्र संवाद साधतो. माझी बरीत भावंडं आता कामानिमित्त बाहेर आहेत त्यामुळे भाऊबीजेच्या निमित्ताने त्यांच्याशी बोलणं होतं. एकमेकांच्या आयुष्यात काय सुरू आहे याबद्दल जाणून घेता येतं. एकूण काय तर माझी दिवाळी मी मित्र मंडळी आणि परिवारासह साजरी करते’.