मराठी पोरी with मराठी बायको!! ‘झिम्मा 2’च्या भन्नाट गाण्यावर थिरकले सिद्धार्थ- मिताली; व्हिडीओ व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सोशल मीडियावर बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘झिम्मा २’ या चित्रपटाबाबत प्रेक्षकांची वाढत असलेली उत्सुकता प्रकर्षाने दिसते आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या चित्रपटाचा टिझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान या चित्रपटातील पहिले गाणे ‘मराठी पोरी’ अलीकडेच रिलीज झाले आहे. जे सोशल मीडियावर टॉप ट्रेंडिंग आहे. या गाण्यावर नेटकरी रिल्स बनवताना दिसत आहेत. अशातच अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने बायको मितालीसोबत या गाण्यावर डान्स केला आहे.

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि त्याची पत्नी व अभिनेत्री मिताली मयेकर सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. शिवाय मराठी सिनेविश्वातील ही अत्यंत लोकप्रिय जोडी आहे. ‘झिम्मा २’ या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ चांदेकर अत्यंत महत्वपूर्ण भूमिकेत आहे. त्यामुळे सध्या प्रमोशन साठी चित्रपटाच्या टीमप्रमाणे सिद्धार्थ सुद्धा वेगवेगळे फंडे आजमावताना दिसतोय. ‘झिम्मा २’मधील ‘मराठी पोरी दुनियेला दाखवती माज…’ या गाण्यावर अनेक नेटकरी रिल्स बनवत आहेत. यावर आता सिद्धार्थ चांदेकरनेही त्याची बायको मितालीसोबत घरी भन्नाट डान्स केला आहे.

सिद्धार्थ आणि मितालीने हा व्हिडीओ त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. सोबत कॅप्शनमध्ये ‘मराठी पोरी with मराठी बायको!!’ असे सिद्धार्थने लिहिले आहे. सिद्धार्थ- मितालीच्या या डान्स व्हिडीओला काही तासांमध्येच लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक नेटकरी आणि सेलिब्रिटी मंडळी कमेंट करताना दिसत आहेत. दरम्यान, ‘झिम्मा २’ हा चित्रपट येत्या २४ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरु, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत आहेत.