27 वर्षांचा याराना!! किरण मानेंनी शेअर केली दोस्तासाठी खास पोस्ट; म्हणाले, ‘शेवटच्या श्वासापर्यन्त आसंल..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता किरण माने हे सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. वेगवेगळे किस्से, विविध विषयांवर भाष्य आणि निकटवर्तीयांच्या आठवणी शेअर करण्यासाठी एखाद्याचे कौतुक करण्यासाठी ते पोस्ट शेअर करत असतात. नुकतंच किरण मानेंनी एक पोस्ट शेअर करुन अभिनेते किशोर कदम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी आयुष्यातली भावनिक गोष्टींचा उलघडा केला आहे.

किरण माने यांनी लिहिले, ‘किशोर, आपल्या मैत्रीला सत्तावीस वर्ष होतील. जवळजवळ तीन दशकांतले एकमेकांच्या आयुष्यातले लै चढऊतार आपन बघितलेत. प्रत्येकवेळी प्रत्यक्ष बरोबर नसलो तरी आपण एकमेकांसोबत आहोत ही मनोमन खात्री होती…अजूनबी हाय… शेवटच्या श्वासापर्यन्त आसंल. …वीस-बावीस वर्षांपूर्वीचा एक काळ असा होता की मी घरच्या परिस्थितीमुळं अभिनयात करीयरचं स्वप्न गुंडाळून, सगळं सोडून सातारला येऊन र्‍हायलोवतो. दुकान सुरू झालं. ”आता आपण अभिनयात करीयर करू शकणार नाही”. या विचारांनी मन- मेंदू पोखरून निघालंवतं. घुसमटलोवतो. एक दिवस दुकानासमोरनं मुंबैच्या एका व्यावसायिक नाटकाची गाडी पास झाली. किशोर, ती आपली ”सुयोग” नाटक कंपनीची गाडी होती! ती गाडी बघितली आन् लै आठवणी जाग्या झाल्या… तू, मी, अतुल कुलकर्णी, भक्तीताई आपन त्या गाडीतनं ”गांधी विरूद्ध गांधी” नाटकाचे महाराष्ट्रभर दौरे केलेले आठवले!

‘हे सगळं हरवलं कायमचं, या वेदनेनं कळवळलो. तिथनं थेट एका बारमध्ये गेलो. असं वाटलं आता डोकं शांत होईल. कशाचं काय? उलट डोक्यात भडका उडाला. घरी आलो.. टेरेसवर जाऊन एकटाच ढसाढसा रडलो. बरोब्बर दूसर्‍याच दिवशी अचानक तुझा फोन आला. “किरन्या, किशोर बोलतोय.”.. त्यापूर्वी दोन वर्ष आपला एकमेकांशी कसलाबी संपर्क नव्हता. “आयला. किशोरच्या लक्षात हाय आपन!!??”.. तू म्हणालास “किरण्या, मी एक सिनेमा दिग्दर्शित करतोय. रंगनाथ पाठारेंच्या कादंबरीवर आधारीतय. त्यात एक खूप महत्त्वाच्या रोलसाठी मला तू हवायस. पुण्यात भेटायला ये… थांब थांब.. मीच तुला न्यायला येतो.कुठं येऊ सांग.” तू खरंच मला न्यायला आलास. पुण्यातल्या ऑफिसमध्ये सिनेमाचं वाचन झालं… …जरी त्या सिनेमाचं पुढं काही कारणांनी शुटिंग होऊ शकलं नाही, तरी त्या एका घटनेनं माझ्या मनाला लै लै लै उभारी दिली किशोर!’

‘लै लै जबराट क्षण जगलो तुझ्यासोबत किशोर. आज तू ‘सौमित्र’ म्हणून उभ्या महाराष्ट्रात लोकप्रिय आहेस.. पण आपली मैत्री झाली त्यावेळी तू लै फेमस नव्हतास.. तू अचानक सातारला यायचास.. मग आपण कास पठारावर रात्रभर चांदण्यात ”बसायचो”… कधी बामणोलीच्या रिसाॅर्टवर दोन दोन दिवस रहायचो.. आत्ता तुझ्या ज्या कविता महाराष्ट्राला पाठ आहेत, त्या खूप वर्ष आधी जन्मल्या-जन्मल्या ऐकायचं सुख मला लाभलंय ! तुझ्या कवितांच्या नशेसारखी नशा मी आयुष्यात कधी अनुभवली नाही. तुझ्यामुळं माझ्या आयुष्यात ”गुलज़ार” आला.. ”जावेद अख्तर” आला.. ‘निदा फ़ाज़ली ‘ आला.. सोलापूरमध्ये एकदा रात्रभर रंगलेली ती मैफिल तर आयुष्यात विसरणार नाही. सगळे मिळुन आठदहा जण असू.. अक्षरश: ”माहौल” जमलावता’.

‘कविता- गझल- शेरोशायरी- गप्पाविनोद… त्या मैफिलीत ग्रामोफोनवर ऐकलेलं उस्ताद बडे गुलाम अली खाँ साहेबांचं “का करू सजनी आये ना बालम” आणि बेगम अख्तरचं “हमरी अटरीया पे आवो सँवरीया”. आग्ग्ग्गाय्याया.. कहर होता कहर.. आठवणीनंही अंगावर काटा आला. तुझं कवितांचं पहिलं पुस्तक पाॅप्यूलरनं प्रकाशित केलं होतं ‘…आणि तरीही मी’ ! ते मला भेट देताना तू त्यावर लिहीलंस, “प्रिय किरण, माझ्या कवितांवर माझ्याइतकंच प्रेम करतोस. जर आपल्या आयुष्यात ‘गांधी’ नसते आले तर? तरी कुठेतरी भेटलो असतोच आणि असेच मित्र असतो ! – किशोर.” …किशोर, वाढदिवसाच्या लै लै लै शुभेच्छा. लब्यू. लब्यू लैच !”