तुका आशेचा किरण!! दिवाळी अंकात छापून आला किरण मानेंचा संघर्ष; म्हणाले, ‘स्वप्नातबी विचार केला नव्हता..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेता किरण माने हे कायम सोशल मीडियावरील पोस्ट्समुळे चर्चेत असतात. ‘मुलगी झाली हो’ मालिकेतील विलास पाटील आणि त्यानंतर बिग बॉसमध्ये सातारचा बच्चन किरण माने यांनी प्रेक्षकांच्या मनावर जादू केली. ‘मुलगी झाली हो’ या मालिकेदरम्यान किरण माने यांच्या आयुष्यात एक वेगळाच संघर्ष निर्माण झाला. पण सर्व अडीअडचणींमधून ते बाहेर पडले आणि आज त्यांचा चाहता वर्ग दुप्पटीने वाढला आहे. दरम्यान नुकतंच त्यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी एका दिवाळी अंकाचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये किरण माने यांचा संघर्ष लिहिण्यात आला आहे.

तर किरण माने यांनी ही पोस्ट शेअर करताना लिहिले, ‘…माझ्या आजवरच्या संघर्षाचा मागोवा घेणारा दिवाळी अंक निघेल, असा मी कधी स्वप्नातबी विचार केला नव्हता भावांनो ! मी स्वत:ला एवढा मोठा नक्कीच समजत नाही. पण मला अभिनेता म्हणून प्रेक्षकांचं, विशेषत: ग्रामीण मातीशी नाळ असलेल्या भावाबहिणींचं लै लै लैच प्रेम लाभलं, हे मात्र शंभर टक्के खरं. त्या प्रेमापोटी माझ्या चाहत्यांनी दिलेली ‘दिवाळी गिफ्ट’ म्हणून मी ‘झुंजार वीर’चा हा विशेषांक नम्रपणे स्विकारतो. या अंकात सुरूवातीला माझ्या ‘बिगबाॅस’ या रिॲलिटी शो मधला माझ्या प्रवासाचा वेध, बिगबाॅस खेळाच्या ‘डाय हार्ड’ चाहत्या आणि अभ्यासक स्वरा गीध यांनी घेतला आहे. त्यानंतर माझ्याच वेगवेगळ्या फेसबुक पोस्टस् संकलीत करून त्यातनं माझा आजवरच्या आयुष्याचा प्रवास, अभिनयक्षेत्रातला संघर्ष, जवळची माणसं, विचारधारा याचा उलगडा करण्याचा प्रयत्न ‘झुंजार वीर’च्या या दिवाळी अंकानं केला आहे. अंकाला शिर्षक आहे, ‘तुका आशेचा किरण’!’

‘बाकी कायबी असो, मला प्रेक्षकांची मनापास्नं आभाळभर माया मिळलीय. मला एका सिरीयलमधनं काढून टाकल्यावर महाराष्ट्रभरातल्या प्रेक्षकांनी उत्सफूर्तपणे मला दिलेला ‘सपोर्ट’ असेल… मला गांवोगांवी व्याख्यानांसाठी बोलावणं असेल… बिगबाॅसमध्ये मी असताना डोंगराएवढा पाठिंबा देऊन मला फायनलीस्ट बनवणं असेल… बिगबाॅसमधून आल्यानंतर गांवोगांवी माझ्या मिरवणूका काढणं, ‘बिगबाॅस पब्लीक विनर किरण माने’ असे फ्लेक्स लावणं… दर महिन्याला एक, अशा संख्येनं सतत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करणं… किंवा शिव-शाहू-फुले-आंबेडकर आणि तुकोबारायांच्या विचारांच्या प्रसारासाठी अनेक सामाजिक उपक्रमात मला हक्कानं बोलावणं… या वर्षावानं मी अक्षरश: भारावून गेलोय. ज्या-ज्या गांवात शुटिंगला जातोय, तिथल्या घराघरांत लोक बोलवू इच्छितात’.

‘माझ्या ‘विलास पाटील’ आणि ‘अभिमान साठे’ या भुमिकांच्या चाहत्या असलेल्या माझ्या अनेक भगिनी माझे आवडते पदार्थ करून खाऊ घालण्यासाठी धडपडतात. कालच मी कोळे नांवाच्या गांवात शुटिंग करत असताना एका घरातनं आवाज आला, “किरणसर, तुमच्यासाठी खास तुमचे आवडते बेसनाचे लाडू केलेत. यायलाच लागतंय तुम्हाला आता. या ॠणात रहायला कायम मला आवडेल. इथून पुढेही माझ्या चाहत्यांना अभिमान वाटेल असंच काम माझ्या हातून होईल. अभिनयप्रवासाचा आलेख कायम उंचावलेलाच दिसेल. विचारधारेवरून मला हितशत्रूंनी कितीही त्रास देऊदेत, ट्रोल करूदेत, त्या विरोधाला झुगारून देऊन मी निडरपणे आपल्या सगळ्या महामानवांच्या विचारांचा प्रसार करेन… बुद्धापास्नं तुकोबारायापर्यन्त माझी नाळ जोडलेली हाय भावांनो. त्यामुळं कितीबी आघात झाले, तरी शेवटच्या श्वासापर्यन्त माझी मूळं मी सोडणार नाय’. किरण मानेची हि पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.