दुर्जनांचा महाकाल… भक्तांसाठी ढाल! ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ मालिका ‘या’ दिवशी सुरु होणार


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावर अनेक अध्यात्मिक मालिका सुरु आहेत. यातील बऱ्याच मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात एक भक्कम जागा निर्माण केली आहे. या मालिकांमधून विविध देवदेवतांची कथा, दैवी चमत्कार, साक्षात्काराबद्दल माहिती दिली जाते. त्यामुळे या मालिका प्रेक्षकांसाठी केवळ मनोरंजन नव्हे तर अध्यात्माचा एक नवा अंग घेऊन येत असतात. आता अशीच कोकणच्या ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’वर आधारलेली मालिका सुरु होत आहे. सोशल मीडियावर या मालिकेचे प्रोमो व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

गेल्या दोन वर्षात सन मराठी या वाहिनीने विविध कथानकांवर आधारित मालिका आणल्या. यातच आता ‘श्री देव वेतोबा’ची कथा छोट्या पडद्यावर येते आहे. हि नवी कोरी मालिका येत्या १७ जुलै २०२३ पासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता सन मराठी या वाहिनीवर सुरु होत आहे. कोकणातील परंपरा, प्रथा, रुढी याविषयी नेहमीच प्रत्येकाला गूढ वाटत आले आहे. त्यामुळे कोकणातील कथांविषयी एक वेगळे आकर्षण पाहिले जाते. त्यापैकीच एक वैशिष्ट्य म्हणजे ‘श्री देव वेतोबा’. जो भक्तांचा रक्षणकर्ता, कोकणचा क्षेत्रपाल, संकट निवारक आणि सिंधुदुर्गातील आरवली गावाचे ग्रामदैवत आहे. वेतोबा म्हणजे भूतनाथ.

भक्ताच्या हाकेला धावून जाणाऱ्या या देवाची गोष्ट आता प्रेक्षकांना भव्य दिव्या स्वरूपात अनुभवता येणार आहे. या मालिकेत श्री देव वेतोबाच्या भूमिका अभिनेता उमाकांत पाटील पहायला मिळणार आहे. मालिकेचा विचार करून शरीर रचना, बांधा, रूप लक्षात घेत श्री देव वेतोबाच्या भूमीएकसाठी त्याची निवड करण्यात आली आहे. ‘सोमिल क्रिएशन’ प्रॉडक्शन हाऊस प्रस्तुत, सुनील भोसले निर्मित “क्षेत्रपाल श्री देव वेतोबा” मालिकेचे दिग्दर्शन नितिन काटकर यांनी केले असून निलेश मयेकर निर्मिती संकल्पक आहेत. तर राजेंद्रकुमार घाग यांनी पटकथा आणि महाबळेश्वर नार्वेकर यांनी संवाद लिहिले आहेत.

संकटसमयी वेगवेगळ्या रूपांत हाकेला धावून येणाऱ्या श्री देव वेतोबाची प्रचिती कित्येक गावकऱ्यांना आल्याचे ते सांगताना दिसतात. या देवाचे स्वरूप अत्यंत भव्य आहे. हातात काठी घेऊन भव्य- दिव्य देहरूप असलेला हा देव गावांच्या वेशींवर गस्त घालतो. कुणी भक्त संकटात असेल तर त्याचे रक्षण करतो, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे कोणतेही मोठे काम सुरु करण्यापूर्वी वा मोठा निर्णय घेण्यापूर्वी कोकणवासी आपल्या श्री देव वेतोबाचा कौल घेतात. तशी येथील प्रथाच आहे. श्री देव वेतोबा’चे मंदिर कोकणातील आरवली या ठिकाणी वसलेले असून अत्यंत जागृत असे देवस्थान आहे.