सातारच्या बच्चनसोबत सावत्या धमाल करणार; एकाच चित्रपटात ‘माने बंधू’ झळकणार


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारे अभिनेते किरण माने लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. मुख्य म्हणजे या चित्रपटात त्यांच्यासोबत ‘महाराष्ट्रातील हास्यजत्रा’ फेम रोहित मानेदेखील महत्वाच्या भूमिके दिसणार आहे. त्याहीपेक्षा महत्वाचं असं कि, किरण माने आणि रोहित माने दोघांची आडनावं सारखीच आणि गावही सातारा. त्यामुळे हे २ सातारकर एकाच चित्रपटात दिसणार आहेत याचा एक वेगळाच आनंद प्रेक्षकांमध्ये आणि या दोन्ही कलाकारांमध्ये आहे. किरण माने यांनी रोहितसोबतचे काही फोटो शेअर करत एक पोस्ट शेअर करून हि माहिती दिली आहे.

किरण मानेंनी हि पोस्ट शेअर करत लिहिले कि, ‘रोह्या भेटल्या- भेटल्या म्हन्ला, ‘..रोह्या भेटल्या-भेटल्या म्हन्ला, “अहो किरणसर, चाहते सेल्फी काढायला येतात, तवा कुनीतरी एक प्रश्न हमखास इचारतं, किरण मानेंचे तुम्ही नातेवाईक का..?’ मी म्हन्लं अरे मलाबी इचारत्यात, “रोहित माने तुमचा कोन..?” मी सांगतो, “लहान भाऊ.” रोह्यानं मिठीच मारली. हास्यजत्रानं मराठीला जी अनमोल रत्नं दिली, त्यातलं हे एक रत्न. …पयल्यांदाच भेटलो, पन लै दिवसांची वळख असल्यागत मैत्री झाली. एकतर दोघंबी एम.एच.अकरा… आन् दुसरं म्हन्जे दोघंबी काळजात ‘नाटक’ जपनारे!’

‘आता आम्ही अस्सल सातारी ‘माने बंधू’ मिळून एक पिच्चर करतोय. नादखुळा इषय, भन्नाट श्टोरी, जबराट भुमिका. दोन किरानिष्ट बोड्याचे अतरंगी सातारकर एकत्र आल्यावर जाळ धूर व्हायचा त्यो हुनारच हाय. बाकी निर्माता, लेखक, दिग्दर्शक, इतर सहकलाकार याबद्दल हळूहळू सांगेन सविस्तर. आत्ता थोडी उत्सुकता तर तानूद्या की भावांनो. नाय का? पिच्चर अभी बाकी है मेरे दोस्त !’ किरण मानेंची हि पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, प्रेक्षक या ‘माने बंधूंना’ एकाच चित्रपटात पहायला उत्सुक आहेत.