हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका अत्यंत लोकप्रिय आहे. या मालिकेत गिरीजा प्रभु, मंदार जाधव, माधवी निमकर, वर्षा उसगावकर, मिनाक्षी राठोड, सुनिल गोडसे, कपिल होनराव, गणेश रेवडेकर अशी जबरदस्त स्टारकास्ट आहे. प्रत्येकाने साकारलेली पात्र हि प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहेत. त्यामुळे या मालिकेचा टीआरपी नेहमीच अव्वल स्थानावर असतो. अशातच मालिकेने २५ वर्ष पुढे उडी मारली आहे. ज्यामध्ये अनेक जुनी पात्र दिसणार नाहीत असे समोर आले आहे.
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ हि मालिका २५ वर्षांचा लीप घेतल्यामुळे यात बरेच बदल दिसून येणार आहेत. आता या मालिकेत गौरी- जयदीपच्या पुनर्जन्माची कथा पहायला मिळणार आहे येत्या २० नोव्हेंबर २०२३ पासून मालिकेचे हे पुढील पर्व सुरू होणार आहे. दरम्यान या मालिकेतील बऱ्याच पात्रांचा प्रवास संपणार असल्याचे समोर आले आहे. मालिकेच्या नव्या कथानकात अनेक नवीन पात्र झळकणार असून जुन्या आणि लोकप्रिय ठरलेल्या पात्रांना मात्र निरोप घ्यावा लागणार आहे.
रिपोर्टनुसार, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील गौरी, जयदीप, शालिनी, देवकी, माई, मल्हार, लक्ष्मी ही पात्रे फार लोकप्रिय ठरली. पण आता गौरी- जयदीपच्या पुनर्जन्माची कथा सुरु होताना यातील बरीच पात्र दिसणार नाहीयेत. ज्यामध्ये कटकारस्थानी बायको आणि साधा- भोळा नवरा म्हणजेच शालिनी आणि मल्हार यांची जोडी एक्झिट घेणार आहे.
त्यामुळे गौरी- जयदीपच्या पुनर्जन्माच्या कथेत शालिनी आणि मल्हार दिसणार नाहीत. मालिकेच्या पहिल्या पर्वात शालिनी खलनायिका होती. पण आता तिची एक्झिट झाल्यानंतर या नव्या पर्वात खलनायिका कोण साकारणार..? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.