हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रकाश झोतात आलेला कुशल बद्रिके आज विनोदाचा हुकमी एक्का म्हणून ओळखला जातो. गेली अनेक वर्ष कुशल वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. कुशल सोशल मीडियावर फार सक्रिय असतो आणि या माध्यमातून तो अनेकदा व्यक्त होत असतो. त्याने शेअर केलेल्या अनेक पोस्ट मनाला भिडणाऱ्या असतात आणि आजही त्याने अशीच एक पोस्ट शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अभिनेता कुशल बद्रिकेने ही पोस्ट अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. यात त्याने शेअर केलेल्या फोटोत तो स्वतः फटाक्यांची माळ पेटवताना दिसतोय. सोबत लिहिलेल्या कॅप्शनमध्ये त्याने प्रदूषण, फटाके आणि एकंदरच दिवाळीच्या सणा बद्दल भाष्य केलंय. त्याने लिहिलंय, ‘आमच्या लहानपणी, दिवाळीतले फटाके म्हणजे social media वर पेटवला जाणारा pollution चा मुद्दा नव्हता. जसा कंदील,रांगोळी, दिवे, ऊटण असतं तसंच फटाकेही असायचेच. आमच्या लहानपणी, आम्ही फटाके फोडत असताना माझे पप्पा घराच्या ओट्यावर बसून, आमच्यावर लक्ष ठेवायचे “लवंगी फटाक्यांच्या माळेला” जी पुढे “गाठ” असते ती सोडवून एक एक फटाका सुटा करून द्यायचे माझी दिवाळी खूप वेळ वाजत राहायची….’
पुढे लिहिलंय, ‘आता मात्र फटाके फोडायला वेळेची बंधन आहेत पण फटाक्यांच स्वरुप कमालीच बदललंय डोळ्यांना दीपवून टाकणारे, आसमंत उजळवून टाकणारे, वेग वेगळे रंग आणि आवाज काढणारे एका भुईचक्रातून असंख्य भुईचक्र निघणारे, भारावून टाकणारे फटाके मिळतात बाजारात. हल्ली दिवाळी खूप भारी असते….. फक्त साला, तो “गाठी सोडवून देणारा” माणूस आयुष्यात राहिला नाही एवढच….’. कुशलची हि पोस्ट नेटकऱ्यांना त्यांच्या लहानपणात घेऊन गेली आहे. अनेकांनी या पोस्टवर प्रतिक्रिया देताना तसा उल्लेख केला आहे.