‘नालायक पिक्चर्स बघतोच आपण..’; चित्रपट ‘नाळ 2’ पाहिल्यानंतर महेश मांजरेकरांनी दिली ‘अशी’ प्रतिक्रिया


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित ‘नाळ भाग २’ची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. दिवाळीत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच आता मराठी कलाकारांचीही या चित्रपटासोबत नाळ जोडली जात आहे. अनेक कलाकार आपल्या सोशल मीडियावरून या चित्रपटाचे भरभरून कौतुक करत आहेत. अलीकडेच प्रसिद्ध दिग्दर्शक विजू माने यांनी ‘नाळ भाग २’ या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव केला होता. यानंतर आता अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनीदेखील चित्रपटाचे आणि कलाकारांचे कौतुक केले आहे.

अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवर एक खास व्हिडीओ शेअर करत ‘नाळ भाग २’ या चित्रपटाचे विशेष कौतुक केले आहे. या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकर म्हणाले कि, ‘अप्रतिम सिनेमा आहे नाळ. अभिमान वाटला, की मराठीत असा चित्रपट आला आहे. ”नाळ भाग २” हा सिनेमा देशात सगळ्यांनी बघायला पाहिजे. यात तीन मुलांची कामे आहेत. नक्कीच अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये या चित्रपटाला नामांकने मिळतील. विशेषतः या चित्रपटातील चिमीची भूमिका साकारणाऱ्या त्या चिमुकलीला’.

पुढे म्हणाले, ‘ मी सांगेन तिचे नामांकन सर्वोत्कृष्ट बालकलाकारमध्ये न घेता ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’मध्ये घ्या. मराठी चित्रपट काहीतरी वेगळे देण्याचा नेहमीच प्रयत्न करतात. अतिशय सुंदर चित्रपट आहे. सर्वानी हा चित्रपट नक्की पाहा’.’ असे कौतुक करत महेश मांजरेकर यांनी प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्याचे आवाहनदेखील केले आहे. या व्हिडिओसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘नालायक पिक्चर्स बघतोच आपण.. त्याबरोबर नाळ २ पण बघुयात ना!! अप्रतिम आहे!!’ या पोस्टवर जितेंद्र जोशीने कमेंट करत मांजरेकरांचे आभार मानले आहेत.