हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या नाईक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा लढा जोरदार सुरु आहे. आरक्षणाची मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी तब्बल दोन वेळा उपोषण केलं. दरम्यान दुसरं उपोषण मागे घेताना त्यांनी सरकारला २४ डिसेंबर २०२३ या तारखेपर्यंत निर्णय देण्यासाठी वेळ दिला आहे. तोपर्यंत जरांगे पाटील संपूर्ण महाराष्ट्र दौरा करताना दिसत आहेत. सध्या ते राजधानी साताऱ्यात जनतेशी संवाद साधत आहेत. साताऱ्यात सलग तीन सभा घेत त्यांनी सातारकरांना जागे व्हा, असे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेते किरण माने यांनी पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेता किरण माने हे कायम सोशल मीडियावर सक्रिय असतात. राजकीय असो सामाजिक असो किंवा मनोरंजन क्षेत्राशी संबंधित एखादी बाब असो ते सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होतात. नुकतीच त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे. जी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. यामध्ये किरण मानेंनी मनोज जरांगे पाटील यांचे कौतुक केले आहे. इतकेच नवे तर जरांगे पाटलांनी संविधानाने दिलेली ताकद दाखवून दिली आहे, असंही ते म्हणाले आहेत.
हि पोस्ट शेअर करताना किरण माने यांनी लिहिलंय कि, ‘संविधानाने सामान्य माणसाला दिलेली ताकद जरांगे पाटलांनी दाखवून दिली. कारस्थानी वर्चस्ववाद्यांना बहुजनांमधले भ्रष्टाचारी लोक हाताशी धरून ”फोडा आणि राज्य करा”चा ब्रिटीशी डाव खेळावा लागतोय. पण तो ही हाणून पाडायला संविधानानं शिकवलंय. जरांगे पाटील राजधानी सातार्यात तुमचे मनापासून स्वागत!!!’. या पोस्ट सोबत किरण मानेंनी जय शिवराय आणि जय भीम असे दोन हॅशटॅग दिले होते.