‘सभेनंतरच्या पार्ट्या, दारू सगळं माहितेय..’; जरांगे पाटलांच्या सातारा सभेबाबत मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता किरण माने सोशल मीडियावर फार सक्रिय असतात आणि त्यांनी शेअर केलेल्या पोस्ट कायम लक्षवेधी ठरतात. अलीकडेच मनोज जरांगे पाटील यांच्या साताऱ्यात विविध ठिकाणी जंगी सभा झाल्या. या सभेबाबत किरण माने यांनी लिहिलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, ‘जरांगे पाटलांची राजधानी सातार्‍यातली सभा राजासारखी झाली… देखणी… रूबाबदार. मी खेडेगांवात लहानाचा मोठा झालोय. राजकीय नेत्यांसाठी सभेला गर्दी जमवणं किती सहजशक्य असतं, हे मी डोळ्यांनी पाहिलंय’.

‘कशा जीपा, ट्रक, टेम्पो भरून माणसं सभेला नेली जातात… कशा घोषणा दिल्या जातात. त्यानंतरच्या पार्ट्या, दारू सगळं माहितीय. अशा परिस्थितीत एका सर्वसामान्य माणसाच्या सभेला उत्स्फूर्तपणे, मनापास्नं, स्वत:हून घरातनं उठून सभेला जाऊन बसणारी माणसं बघायला मिळताहेत. भर उन्हात, रात्री दोन- दोन वाजेपर्यंत त्याची वाट पहातात. हे कुठल्याही नेत्याला आजच्या काळात शक्य नाही. मी सातारचं जरांगे पाटलांचं भाषण पूर्ण ऐकलं. जेवढ्या तळमळीनं लोक येतात, तेवढ्याच मनापासून, नितळ, स्पष्ट, परखड, सडेतोड बोलणारा आणि वागणारा हा माणूस आहे’.

‘आरक्षणाविषयी सगळी कायदेशीर माहीती आहे. आरक्षणाचा लाभ घेणार्‍या इतर वर्गांविषयी जराही कटुता त्यांच्या मनात नाही. द्वेषभावना न पसरवता, इतर जातीजमातींना दुखवू नका. ही नेत्यांनी निर्माण केलेली दुफळी आहे. मनातून आपण सगळे जातीधर्माचे लोक एक आहोत. असा सूर भाषणात असतो, जो आश्वासक आहे. संविधान दिन जवळ आलाय. त्याचवेळी एका सामान्य नागरीकाच्या नेतृत्वाखाली, कुठल्याही राजकीय पाठबळाशिवाय, संविधानिक मार्गाने एक भव्यदिव्य आंदोलन उभं रहाणं ही खूप प्रेरणादायी घटना आहे. जय शिवराय… जय भीम’.