शूरा मीं वंदिलें..!! सुबोध भावेने शेअर केली ‘मानापमान’ चित्रपटाची झलक; अभिनेत्याच्या लूकने वेधलं लक्ष


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका, नाटक, सिरीज आणि चित्रपटातून वेगवेगळ्या ढंगाच्या भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता सुबोध भावे सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. संगीत नाटकावर आधारलेल्या ‘कट्यार काळजात घुसली’सारख्या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर सुबोध भावे आता एक नवा प्रयोग घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतीच सुबोधने त्याचा आगामी चित्रपट ‘मानापमान’बद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेता सुबोध भावेने अजरामर मराठी नाटक ‘संगीत मानापमान’वरुन प्रेरित ‘मानापमान’ या आगामी चित्रपटाची एक झलक सोशल मीडियाववर शेअर केली आहे. गेली बरीच वर्ष सुबोध भावे या चित्रपटावर काम करत असून लवकरच ही कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘मानापमान’ या चित्रपटाची सुंदरशी झलक शेअर करत सुबोधने लिहिलं कि, ‘शूरा मीं वंदिलें..! जिओ स्टुडीओज् अभिमानाने सादर करत आहे, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या अजरामर नाटकावरून प्रेरित, शंकर- एहसान- लॉय यांची सांगितिक भेट, सुबोध भावे अभिनित – दिग्दर्शित, ”मानापमान”!’

सुबोध भावेने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये त्याचा रांगडा लुक समोर आला आहे. यामध्ये सुबोध तलवारबाजीचे प्रशिक्षण घेताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून नेटकऱ्यांच्या पसंतीस पडला आहे. शिवाय प्रेक्षकांनी सुबोधचा लुक पाहून चित्रपटाबाबतची उत्सुकता दर्शवली आहे. आतापर्यंत सुबोध भावेच्या ‘बालगंधर्व’, ‘लोकमान्य : एक युगपुरुष’, ‘…आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ अशा बायोपिकमधील भूमिका तुफान गाजल्या आहेत. यानंतर आता प्रेक्षकांमध्ये ‘मानापमान’ या चित्रपटातील सुबोधच्या भूमिकेबाबत उत्सुकता आहे.