प्रिया बापटच्या आगामी हिंदी थ्रिलर सिनेमाची घोषणा; बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत स्क्रीन शेअर करणार


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रिया बापट हि मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री आहे. नाटक, मालिका, वेब सिरीज आणि चित्रपट यांसारख्या वेगवेगळ्या माध्यमातून प्रिया बापटने प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे. यानंतर आता लवकरच प्रिया बॉलिवूड सिनेमात झळकणार आहेत. बॉलिवूड सिनेविश्वात आपल्या अभिनयाने आघाडीवर पोहोचलेल्या नवाजुद्दिन सिद्दिकीसोबत प्रिया बापट एका हिंदी थ्रिलर चित्रपटात एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

मराठी अभिनेत्री प्रिया बापट आणि बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी एकत्र एकाच चित्रपटात पाहण्यासाठी प्रेक्षक देखील आतुर झाले आहेत. चित्रपटाच्या घोषणेपासून प्रेक्षकांमध्ये एक वेगळी उत्सुकता पाहायला मिळते आहे. अद्याप या चित्रपटाचे शीर्षक समोर आलेले नाही. मात्र या चित्रपटाचे कथानक १९९० मधील कथेवर आधारलेले असेल असे सांगण्यात आले आहे. या चित्रपटाचे मुंबईत शूटिंग सुरू आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते लेखक भावेश मंडालिया यांच्या पटकथेवरून सेजल शाह या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तर भानुशाली स्टुडिओ लिमिटेड आणि बॉम्बे फेबल्स प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती विनोद भानुशाली, कमलेश भानुशाली, सेजल शाह आणि भावेश मंडलिया यांनी केली आहे. हा चित्रपट ‘सस्पेन्स, ड्रामा आणि नॉस्टॅल्जिया’ ची रोलर- कोस्टर राइड असेल, असा निर्मात्यांना विश्वास आहे.

तर नवाजुद्दीनसोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल प्रिया बापटने आनंद व्यक्त करत म्हटले कि, ‘ज्या दिवशी मी या चित्रपटाची कथा ऐकली तेव्हापासूनच मी या चित्रपटाचा भाग बनण्यासाठी उत्सुक होते. नवाजुद्दिनसह काम करणे हा एक वेगळाच आनंद होता. चित्रपटाची कथा आकर्षक असून तिने 90 च्या दशकातील नॉस्टॅल्जियाचा एक अतिरिक्त स्तर जोडला आहे. नवाजुद्दीनबरोबर काम करणे हा रोजचा शिकण्याचा अनुभव आहे आणि आम्ही या वेधक कथेला जिवंत करण्यास उत्सुक आहोत’.