‘हा सिनेमा आमचा राहिला नाही, आता तो…’; ‘झिम्मा 2’च्या प्रेक्षकांसाठी हेमंत ढोमेची खास पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ हा चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आज प्रदर्शनानंतर हा चित्रपट पहायला प्रेक्षकांची भव्य गर्दी पहायला मिळाली. या निमित्ताने दिग्दर्शक हेमंत ढोमेने एक पोस्ट शेअर केली आहे. जी चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे.

अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत क्षिती आणि हेमंत एका डोंगराळ वाटेतून चालत असल्याचे दिसत आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय, ‘हे असंच एकमेकांना साथ देत, खाच खळग्यातुन वाट काढत… कधी अडखळत तर कधी हसत खेळत… झिम्मा २ चा संपुर्ण प्रवास झाला! पण या प्रवासाची प्रचंड मजा घेत आम्ही आपला झिम्मा २ पुर्ण केला…’

पुढे लिहिलं, ‘माझ्या संपुर्ण टिमची साथ नसती तर हे शक्य झालं नसतं. झिम्मा २ शी जोडल्या गेलेल्या सगळ्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो!!! हा सिनेमा आमचा राहिला नाही, तो तुमचा झालाय… ती सगळी पात्र, त्यांचं सारं काही तुमचं झालंय… मागच्या खेपेला तुम्ही त्याचा सोहळा केलात… आम्हाला खात्री आहे, यावेळी देखील तुम्ही तितकंच प्रेम कराल!!! आमचं म्हणजे चलचित्र मंडळीचं हे तिसरं अपत्य… आमच्या काळजाचा तुकडा अतिशय प्रेमाने बहाल करतोय, आजपासून जवळच्या चित्रपटगृहात!!!’ या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरु, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. प्रेक्षकांकडून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत दिसत आहे.