‘अबोला धरलेली सखी सापडलीच तर…’; जितेंद्र जोशीचा ‘संगीत देवबाभळी’ला काव्यमय निरोप


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी रंगभूमीवर दैवत्वाची प्रचिती देणारं अन भक्ताशी देवाचं असलेलं नातं व्यक्त करणारं नाटक ‘संगीत देवबाभळी’ने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या नाटकाशी प्रेक्षकांची नाळ इतकी घट्ट जोडली गेली होती कि त्याला निरोप देणं फार जड झालं. नाटकाचा शेवटचा प्रयोग मुंबईच्या षणमुखानंद नाट्यगृहात कार्तिकी एकादशीच्या पुर्वसंध्येला पार पडला. प्रेक्षकांच्या आणि रंगभूमीच्या साक्षीने एका उत्तम कलाकृतीने निरोप घेतला. गेली सहा वर्ष हे नाटक संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलं आणि अखेर ही वारी २२ नोव्हेंबरला थांबली.

‘संगीत देवबाभळी’चा निरोप घेण्यासाठी या शेवटच्या प्रयोगाला अनेक मान्यवर उपस्थित होते. मराठी अभिनेता जितेंद्र जोशीदेखील या शेवटचा प्रयोग पहायला आवर्जून उपस्थित राहिला होता. तर या नाटकाला निरोप देताना जितेंद्र जोशीने एक खास कविता केली आहे. जी त्याने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामच्या माध्यमातून शेअर केली आहे. ही कविता पोस्ट करताना जितेंद्रने लिहीलंय की, देवबाभळी…

स्वागताला रांगोळी रेखाटली
आवलीच्या चुलीतल्या राखेची
आणि निरोपाला
तिच्या पायाच्या जखमेची चिंधी
हातात देत
तुकोबाच्या गाथेतलं एक एक पान घेऊन
अभंगाच्या ओव्या त्यानं वाटल्या
त्याला समजलेला अर्थ मौनात ठेवून
ज्याला त्याला त्याचा त्याचा अर्थ
अलगद मनात झिरपवू दिला
आणि
आजवर भेटायला आलेल्या प्रत्येकाला म्हणाला
तुमचा तुमचा
तुका आणि विठू
तुमचा तुम्ही शोधा
तो सापडो अथवा न सापडो
परंतु रुसलेली, जखम झालेली,
अबोला धरलेली सखी सापडलीच
तर मात्र मदत करा
तिला तिचा पाऊस शोधायला

तिचा पाय बुडेल तीच तुमची इंद्रायणी
तिच्या सोबत तंद्रटपणे भिजा
तिला ते स्वप्न वाटेल मग
तुम्ही सुद्धा डोळे बंद करून तिचं
स्वप्न होण्यासाठी तिचे डोळे व्हा
तिच्यासोबत तुम्हीही हाका मारून बोलवा तिच्या सख्या ला
कुणी येवो ना येवो.. हाक मात्र आत्म्याची असू दे
या जन्मात नाही तर पुढच्या
तो येवो ना येवो
सर्वांना हाक मारण्याची असोशी आणि आत्मा मिळो
तुका, विठो मिळो ना मिळो
आवली कळो.. रखुमाई कळो

आ….. वं….. – जितेंद्र शकुंतला जोशी
देवबाभळी #निरोप
‘संगीत देवबाभळी’ या सर्वोत्तम कलाकृती असणाऱ्या नाटकाला सर्वाधिक ४४ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. अवघा महाराष्ट्र विठुमय करत ‘देवबाभळी’ नाटकाने ५०० व्या प्रयोगानंतर ही वारी थांबवली आणि प्रेक्षकांचा निरोप घेतला.