टोमॅटो फ्रिजमध्ये ठेऊ कि बँकेत..? MHJ फेम कलाकाराने केला वाढत्या महागाईचा उपहास


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून महागाई पुन्हा एकदा हातपाय पसरताना दिसू लागली आहे. हळूहळू भाज्यांचे दर पुन्हा एकदा आभाळाला भिडले आहेत. दरम्यान भाजी, डाळ, सांबरमध्ये वापरला जाणारा टोमॅटो इतका महाग झालाय कि सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आले आहेत. टोमॅटोचा दर १२० ते १५० रुपये प्रति किलो इतका झाल्याने तो खायचा कि नाही असा प्रश्न पडला आहे. असे असताना आता पुन्हा एकदा महागाईवर उपहास सुरु झाला आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता श्रमेश बेटकर याने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. जी तुफान व्हायरल होत आहे.

टोमॅटो इतके महाग झाल्याने सर्वसामान्यांपासून ते सत्ताधाऱ्यांपर्यंत सगळ्यांच्याचं भुवया उंचावल्या आहेत. टोमॅटोच्या वाढलेल्या किंमती पाहून सगळेच चक्रावले आहेत. यावर अनेकांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या असून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता श्रमेश बेटकरने त्याच्या विनोदी यंदाजात या महागाईचा उपहास केला आहे. टोमॅटोच्या वाढलेल्या किंमतीबद्दल त्याने शेअर केलेली इंस्टाग्राम स्टोरी सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्याने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्राम स्टोरीवर स्वतःचा एक फोटो शेअर करत लिहिलं आहे कि, ‘सकाळपासून एकच गोष्ट कळत नाहीये, टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवू की बँकेत..?’ याचसोबत त्याने महागाई हा हॅशटॅग वापरला.

अभिनेता श्रमेश बेटकर हा सोनी मराठी वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय कॉमिक शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून विविध पात्रे साकारताना दिसतो. त्याचा अभिनय आणि त्याच कमाल विनोदाचं टायमिंग प्रेक्षकांना चांगलंच भावतंय. श्रमेश सोशल मीडियावर फार सक्रिय असतो आणि याच माध्यमातून तो आपल्या चाहत्यांसोबत विविध पोस्ट शेअर करताना दिसतो.