हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजन क्षेत्रातील अत्यंत लोकप्रिय जोडी अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे अलीकडेच लग्न बंधनात अडकले. दोघांच्याही लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर अजूनही व्हायरल होत आहेत. यानंतर आता लवकरच अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि गायक आशिष कुलकर्णी लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. सध्या टिकेकर आणि कुलकर्णी कुटुंबात लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. तर दुसरीकडे त्यांच्या केळवणाची सुरुवात झाली आहे. नुकताच दोन्ही कुटुंबियांच्या केळवणाचा कार्यक्रम पार पडला आहे.
अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि गायक आशिष कुलकर्णी दोघेही त्यांचं केळवण एन्जॉय करत आहेत. कुलकर्णी आणि टिकेकर कुटुंबियांच्या एकत्र केळवणाच्या कार्यक्रमाचे फोटो स्वानंदी आणि आशिषने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये स्वानंदी आणि आशिष यांच्यासह त्यांचे कुटुंबीय दिसत आहेत. याआधी काही दिवसांपूर्वी सुकन्या मोने यांनी स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी यांचं पहिलं केळवण जंगी थाटात केलं. त्याचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
स्वानंदी आणि आशिष यांनी सोशल मीडियावर प्रेमाची कबुली दिल्यानंतर काही महिन्यांपूर्वीच त्यांचा साखरपुडा पार पडला. ज्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. यानंतर आता चाहते त्यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत.
स्वानंदी- आशिष यांचं लग्न कुठे होणार..? याबाबत वधुपिता उदय टिकेकर यांनी माहिती देताना म्हटले आहे कि, ‘हे लग्न डिसेंबरमध्ये पुण्यातच होईल. कारण आम्हीही पुण्याचेच आणि आशिषचं कुटुंबही पुण्याचं आहे. मी कामानिमित्त मुंबईत असतो. पण लग्नाचं ठिकाण पुणे असेल आणि लोकेशन खूप सुंदर असेल’. अजून स्वानंदी- आशिषच्या लग्नाची तारीख आणि ठिकाण याबाबत ठोस माहिती समोर आलेली नाही.