थिएटरमध्ये रंगला आनंदाचा खेळ!! ‘झिम्मा 2’ चित्रपटाची सुपरहिट इनिंग; 5 कोटींचा आकडा पार


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ हा चित्रपट अलीकडेच २४ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित झाला. सध्या हा चित्रपट सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घालताना दिसतो आहे. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या चित्रपटाच्या यशाची उजवी बाजू ठरली आहे. या चित्रपटाने केवळ ४ दिवसांत बॅाक्स ॲाफिसवर ५ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. पहिल्याच विकेंडला ‘झिम्मा २’ चित्रपटाने ४.७७ कोटींचा गल्ला जमवला आणि चौथ्या दिवशी ०.७५ कोटी कमवून ५ कोटींचा टप्पा पार पडला आहे.

या चित्रपटाला मिळणाऱ्या यशाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाला कि, ’प्रेक्षकांकडून मिळणारे प्रेम सुखावणारे आहे. आम्ही अनेक थिएटर्सना भेट देत आहोत खूप ठिकाणी हाऊसफुल्लचे बोर्ड झळकत आहेत. चित्रपट पाहून प्रेक्षकांच्या मिळणाऱ्या प्रतिक्रिया भारावणाऱ्या आहेत. हा भाग आधीच्या भागापेक्षा अधिक चांगला असल्याच्याही प्रतिक्रिया येत आहेत. प्रेक्षक आवर्जून भेटायला येत असून सोशल मीडियावरही अनेकांचे संदेश येत आहेत. प्रेक्षकांकडून ‘झिम्मा २’वर होणारा कौतुकाचा वर्षाव भारी फिलिंग देणारा आहे’.

कलर यल्लो प्रॅाडक्शनच्या सहकार्याने जिओ स्टुडिओज, चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्माते आहेत. तर या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकु राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. वेगवेगळ्या भावनांचे मिश्रण असणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमालीची जादू करतो आहे आणि अजून येत्या दिवसात कमाईचा आलेख आणखी वाढेल अशी चिन्ह दिसत आहेत.