हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लोककलेला जीवन अर्पण केलेले लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मृती प्रित्यर्थ विविध मान्यवरांना मृदगंध पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. यंदा ठाण्यातील काशिनाथ घाणेकर सभागृहात स्मृतीसंगीत समारोहात मृदगंध पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी रंगभूमी आणि सिनेसृष्टीतील अमूल्य योगदानासाठी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याला डॉ. निलम गोऱ्हे, उद्योग मंत्री उदय सामंत, गायक नंदेश उमप, माजी महापौर नरेश म्हस्के, गीतकार संदीप खरे, संगीतकार सलील कुलकर्णी, सरिता उमप हे मान्यवर उपस्थित होते.
हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर दिलीप प्रभावळकर भावुक झाले आणि व्यक्त होत म्हणाले की, ‘मी अभिनयाचे कोणतेही शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले नाही. मी चुकून या क्षेत्रात आलो आहे. ज्यांच्या कार्याला मी मानतो त्या लोकशाहीर विठ्ठल उमप या लोककलावंतांच्या नावाचा पुरस्कार आजच्या दिवशी मिळाला हे माझे भाग्य मानतो. नट म्हणून काही भूमिका आपण विसरतो पण काही भूमिकांचा माणूस म्हणून माझ्यावर परिणाम झाला आहे. त्या भूमिकांमुळे माझा काही सामाजिक संस्थांशी संपर्क आला, मी त्यांच्याशी जोडलो गेलो’.
पुढे म्हणाले, ‘नट म्हणून ही माझी मिळकत आहे. नट म्हणून तुमच्यात माणूसकीचा ओलावा जागृत राहीला पाहिजे. अन्यथा तुम्ही फक्त कोरडे नट राहता’. दिलीप प्रभावळकर यांच्याशिवाय मृदगंध पुरस्कार विजेत्यांमध्ये संगीत क्षेत्रातील योगदानासाठी गायक सुदेश भोसले, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी अनुराधा भोसले, लोककलेतील कलावंत आतांबर शिरढोणकर, अभिनय क्षेत्रातील कामगिरीसाठी अभिनेता सुमित राघवन, अभिनेत्री चिन्मयी सुमित, नवोन्मेष म्हणून गायिका केतकी माटेगावकर यांना सन्मानित केले जाते.